पोर्ट ऑफ स्पेन : सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेव्हिस यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने निर्धारित 35 षटकांत 7 बाद 240 धावा फटकावल्या. त्यानंतर भारतीय संघाला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 35 षटकांत 255 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने 35 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या लढतीत वेस्ट इंडिजला चांगल्या सुरुवातीनंतर तिचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही.
मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशा खेळ केला. सलामीवीर ख्रिस गेलने 41 चेंडूत 72 धावांची आतिषबाजी केली. त्याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याने लेविस (43 धावा) याच्यासोबत पहिल्या गड्यासाठी 11 षटकांतच 115 धावांची भागीदारी केली. मात्र सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यातच लढतीत पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला. त्यावेळी वेस्ट इंडिजने 22 षटकांत 2 बाद 158 धावा केल्या होत्या.
पावसामुळे रात्री उशिरा सामना सुरू झाला तेव्हा प्रत्येकी 35 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांना मोकळीक दिली नाही. त्यातच शाई होप (24), शिमरॉन हेटमायर (25), निकोलस पुरन (30), जेसन होल्डर (14) आणि कार्लोस ब्रेथवेट (16) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अखेरीस विंडीजने 35 षटकांत 240 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. भारताकडून खलिल अहमदने 3, मोहम्मद शमीने 2 तर जडेजा आणि चहल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.