India vs West Indies: इंग्लंड दौरा संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बुधवारी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन डे आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दरम्यान शेवटचे दोन टी२० सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात येणार आहेत.
भारत-विंडिज दौऱ्याची सुरुवात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे २२ जुलै रोजी वन डे मालिकेने होईल. त्यातील उर्वरित दोन वन डे (२४ आणि २७ जुलै) याच मैदानावर होतील. त्यानंतर पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. २९ जुलैची टी२० ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवण्याच येणार आहे. दुसरी आणि तिसरी टी२० वॉर्नर पार्कवर होणार आहे. तर ६ आणि ७ ऑगस्टचे सामने लॉडरहिल (फ्लोरिडा) येथे खेळले जातील.
असा असेल भारताचा वेस्ट इंडिज दौरा-
२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
२९ जुलै - पहिली टी२० - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरी टी२० - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरी टी२० - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथी टी२० - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवी टी२० - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)
भारत-विंडिज मालिकेची आणखी एक गोष्ट म्हणजे, वेस्ट इंडिजचा संघ नवा कर्णधार निकोलस पूरन याच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरणार आहे. या मालिकेबाबत बोलताना तो म्हणाला, "आमचा युवा संघ ज्या प्रकारचे दमदार क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे, तसंच क्रिकेट खेळण्याचा आमचा सर्वोत्तम प्रयत्न असेल", असे पूरन म्हणाला.