India vs West Indies 2nd Test Day 3 Stumps John Campbell and Shai Hope Fifty : टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर वेस्ट इंडिज संघाने अखेर दुसऱ्या डावात फलंदाजीतील धमक दाखवून दिली. पहिल्या कसोटी सामन्यापासून ते अगदी दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावापर्यंत एकाही बॅटरला अर्धशतक झळकावता आले नव्हते. पण शई होप आणि कॅम्पबेलच्या फलंदाजीच्या जोरावर अखेर तिसऱ्या दिवसातील अखेरचं सत्र वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या नावे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फॉलोऑनची नामुष्की, दुसऱ्या डावातही खराब सुरुवात, पण..
भारतीय संघाने फॉलोअन दिल्यावर दुसऱ्या डावातही संघाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजनं टॅगेनरीन चंद्रपॉल याला अवघ्या १० धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. शुबमन गिलनं सर्वोत्तम झेल टिपत त्याच्या खेळीला ब्रेक लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या डावात सर्वोच्च धावसंख्या करणारा अलिक अथनाझे याला वॉशिंग्टन सुंदरनं ७ धावांवर माघारी धाडले. ३५ धावांवर वेस्ट इंडिज संघाने पहिल्या दोन विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर पहिल्यांदाच टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोघांच्या भात्यातून अर्धशतक पाहायला मिळाले.
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
नाबाद अर्धशतकी खेळीसह या दोघांनी अखेरचं सत्र गाजवलं
भारतीय संघ पुन्हा कॅरेबियन ताफ्यातील फलंदाजांना अडचणीत आणेल, असे चित्र निर्माण झाले असताना शई होप आणि सलामीवीर जॉन कॅम्पबेल ही जोडी जमली. शई होप १०३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद ६६ धावा आणि दुसऱ्या बाजूला सलामीवीर कॅम्बबेलनं १४५ चेंडूचा सामना करत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने केलेल्या ८७ धावांच्या जोरावर तिसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही ९७ धावांनी पिछाडीवर आहे. ही जोडी फोडून चौथ्या दिवशी टीम इंडिया विजयाचा डाव साधणार की, सामन्यात नवा ट्विस्ट येणार ते पाहण्याजोगे असेल.