पोर्ट आॅफ स्पेन : भारतीय संघ आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन डेत मैदानावर उतरेल तेव्हा सर्वांच्या नजरा असतील त्या प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यर याच्या कामगिरीकडेच. श्रेयसकडे प्रभावी कामगिरीच्या बळावर चौथे स्थान निश्चत करण्याची मोठी संधी असेल.
श्रेयसला टी-२० मालिकेत अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाले नव्हते. पावसामुळे रद्द झालेल्या पहिल्या वन डेसाठी मात्र तो संघात होता. गयानातील हा सामना १३ षटकानंतर होऊ शकला नाही. दुस-या वन डे दरम्यान चांगले ऊन असेल आणि पावसाचा फटका बसणार नाही, अशी भारताला आशा असेल. भारत फलंदाजी क्रमात बदल करण्याची शक्यता कमीच आहे. संघात स्थान मिळविण्यासाठी दोन सामन्यात प्रभावी कामगिरी पुरेशी ठरणार नाही. तथापि चांगल्या फलंदाजीच्या बळावर तो स्वत:वरील दडपण दूर सारू शकतो.अय्यरने भारत अ कडून वेस्ट इंडिज अ विरुद्ध दोन अर्धशतके ठोकली होती.
कर्णधार विराट कोहलीचे मार्गदर्शन आणि रोहितची साथ मिळताच दिल्ली कॅपिटल्सचा हा फलंदाज मोठी झेप घेऊ शकतो. अय्यरला मधल्याफळीत स्थान देण्याचा अर्थ आघाडीच्या फळीत शिखर धवनच्या उपस्थितीत लोकेश राहुल खेळण्याची शक्यता कमी असेल. राहुलला धवन किंवा रोहितच्या अनुपस्थितीतच सलामीवीराची संधी मिळू शकते.
केदार जाधवसाठीदेखील मालिका मोलाची आहे. खराब कामगिरीमुळे तो संघाबाहेर जाऊ शकतो. शभमान गिलसारखा युवा खेळाडू धावा काढत असल्याने केदारवरील दडपण वाढत चालले आहे. केदारकडे वरच्या स्थानावर खेळण्याचे तंत्र नाही शिवाय तळाला मोठी फटकेबाजी करण्याचीदेखील ताकद नाही. भारताचे डावखुरे फिरकीपटू प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यशस्वी तर ठरले पण कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यापैकी कुणाची वर्णी लागेल हे सांगणे कठीण आहे. भुवनेश्वरला विश्रांती दिल्यास सैनी संघात असेल. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यास युजवेंद्र चहल याला वेगवान अहमदऐवजी संधी दिली जाईल. खलीलने पहिल्या सामन्यात ३ षटकात २७ धावा मोजल्या. कॅरेबियन संघाला लुईस आणि ख्रिस गेल यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे.
संघ
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.