Kuldeep Yadav Tremendous Ball Against Shai Hope : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या कॅरेबियन संघातील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. मोहम्मद सिराजचा भेदक मारा अन् जसप्रीत बुमराहनं विकेटचा डाव साधल्यावर कुलदीप यादवनं आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. कुलदीपनं अप्रतिम चेंडूवर शई होप (Shai Hope) ला चकवा देत त्याची फिरकी घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुलदीप यादवचा अप्रतिम चेंडू; कॅरेबियन फलंदाज चारीमुंड्याचित
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील २४ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार रॉस्टन चेस याने एक धाव घेतली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुलदीपनं टाकलेला चेंडू कळण्याआधी शई होप बोल्ड झाला. टप्पा पडल्यावर चेंडू वेगाने आत वळला अन् सेट होतोय असं वाटणाऱ्या होपचा खेळ खल्लास झाला. होपच्या रुपात कॅरेबियन संघाला मोठा धक्का बसला.
इंग्लंड दौरा बाकावर बसून काढला, मग दुबईचं मैदानात गाजवलं अन् आता....
कुलदीप यादव हा इंग्लंड दौऱ्यावरील तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी स्पर्धेसाठीही टीम इंडियाचा भाग होता. पण या दौऱ्यात त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंड दौरा बाकावर बसून काढल्यावर टी-२० प्रकारातील आशिया कप स्पर्धेत कुलदीपला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली. चेंडू हातात मिळताच त्याने आपली फिरकीतील जादू दाखवत आशिया कप स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. चेंडूचा रंग बदलला तरी गोलंदाजीतील ढंग कायम असल्याचे दाखवून देत आता त्याने घरच्या मैदानातील कसोटी मालिका गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेतच दिले आहेत.
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
कुलदीपची कसोटीतील कामगिरी
कुलदीप यादव याने आपल्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत १३ सामन्यातील २४ डावात ५६ विकेट्स घेतल्या आहेत. यात ४ वेळा त्याने पाच विकेट्सचा डाव साधळा असून ४० धावा खर्च करत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.