Join us

निर्विवाद वर्चस्वासाठी 'गब्बर' सेना सज्ज; मात्र, भारताच्या संघ व्यवस्थापनाची कसोटी!

सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर शुक्रवारी होणारा तिसरा सामनाही जिंकून श्रीलंकेविरूध्द निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:13 IST

Open in App

कोलंबो : सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर शुक्रवारी होणारा तिसरा सामनाही जिंकून श्रीलंकेविरूध्द निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल. परंतु यावेळी कसोटी लागेल ती भारताच्या संघ व्यवस्थापनाची. मालिका जिंकलेली असल्याने औपचारिकता ठरलेल्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी द्यावी, की विजयी संघ कायम ठेवून यजमानांना क्लीन स्लीप देण्याचा पूर्ण प्रयत्न करावा या विचारात भारतीय संघ व्यवस्थापन अडकला आहे. 

तिसर्‍या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ करणार की पृथ्वीच्या जागी देवदत्त पडीक्कल किंवा ऋतुराज गायकवाड या दोघांपैकी एकाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पृथ्वीने पहिल्या सामन्यात भारताला दमदार सुरूवात करून देताना ४३ धावांची खेळी केली होती, तर यानंतर त्याला केवळ १३ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्याजागी पडिक्कल किंवा ऋतुराज यांच्यापैकी एकाला संधी मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्याचवेळी पृथ्वीचे संघातील स्थान कायम राहिल्यास, त्याच्यावर मोठी खेळी करण्याचे दडपण असेल.  

त्याचप्रमाणे युवा यष्टिरक्षक इशान किशनला कायम ठेवावे की समजू सॅमसनला संधी द्यावी असाही प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि मनीष पांड्ये यांचे स्थान निश्चित मानले जाते.

सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघश्रीलंका