IND vs SL, 1st T20I : साडेनऊ वाजता होणार अंतिम पाहणी; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली आणि सामना सुरू होण्यास विलंब झाला. पावसाच्या दमदार एन्ट्रीनं चाहते निराश झालेले पाहायला मिळाले. पावसाचा लपंडाव सुरूच होता. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दोन वेळा पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर उतरला.
2020 या वर्षातील पहिल्याच सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. या मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन पुनरागमन करणार होते. बुमराहच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी बुमराहनं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर तब्बत तीन महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता.
तासभर धुमाकूळ घातल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली, परंतु तोपर्यंत खेळपट्टीचा चांगलाच बोऱ्या वाजला होता. रात्री 8.15 वाजता पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यात ती ओली असल्याचे जाणवले. त्यामुळे 9 वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी केली गेली. पण, 8.13 वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. पंधरा मिनिटानंतर पाऊस थांबला. त्यामुळे सामना होण्याची चिन्ह दिसत होती. पण, खेळपट्टी ओली असल्यानं कोहलीनं नाराजी प्रकट केली. पंचांनी खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशी चर्चा केली. 9.30 वाजता सामन्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. 9.46 ही सामन्याबाबतचा निर्णय घेण्याची अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी सामना खेळवण्याचा निर्णय झाला, तर तो प्रत्येकी 5-5 षटकांचा खेळवला जाईल.