कोलकाता - दक्षिण आफ्रिकेने गेल्या १५ वर्षांत भारतात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळेच पाहुण्यांचा प्रमुख फिरकीपटू केशव महाराजने आगामी भारताचा दौरा त्यांच्यासाठी सर्वांत कठीण दौऱ्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी मालिकेत विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम खूप उत्सुक असल्याचे त्याने नमूद केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी कोलकाता येथे तर दुसरा सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. ऑनलाइन संभाषणादरम्यान महाराज म्हणाला, ‘भारताला भारतातच हरवण्यासाठी आमची टीम खरोखरच खूप उत्सुक आहे. हा कदाचित सर्वांत कठीण दौऱ्यांपैकी एक आहे. आम्हाला वाटते की, ही आमच्यासाठी सर्वांत मोठी परीक्षा असेल. स्वत:चे आकलन करण्याची ही एक शानदार संधी असेल. यामुळे आम्हाला आमची नेमकी स्थिती कळेल.’
विजयाची तीव्र भूक
महाराज म्हणाला, आम्ही उपखंडातील इतर भागांमध्ये जिंकण्यास सुरुवात केली आहे आणि भारतात विजय मिळवण्यासाठी आमच्या टीममध्ये खरोखरच तीव्र भूक आणि इच्छा आहे. दक्षिण आफ्रिकेने अलीकडच्या वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. परंतु, त्यांना भारतात झालेल्या मागील दोन मालिकांमध्ये यश मिळवता आलेले नाही.
खेळपट्टीबाबत बदललेले दृष्टिकोन
महाराजचे असेही मत आहे की, येथील क्युरेटर मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या उपलब्ध करतील याची शक्यता कमी आहे. जसे अलीकडे पाकिस्तानमध्ये घडले होते. कारण, तिथे दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना गमावल्यानंतर त्यांच्या फिरकीपटूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मालिका बरोबरीत आणली होती. डाव्या हाताचा हा फिरकीपटू म्हणाला, “परिस्थिती फिरकीपटूंसाठी तितकी अनुकूल असेल. खेळ पुढे जाईल तशी फिरकीला मदत मिळेल.