भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना गुवाहाटी येथे खेळला जात असून, मालिका बरोबरीत आणण्याची भारतीय संघाची आशा आता जवळपास संपुष्टात आली. मालिकेतील पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला गुवाहाटी कसोटीतही मोठ्या पराभवाचा धोका आहे.
कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, दक्षिण आफ्रिकेने भारतावर तब्बल ३१४ धावांची मोठी आघाडी घेतली. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ आपली आघाडी ४०० ते ४५० धावांपर्यंत वाढवून डाव घोषित करण्याच्या तयारीत असेल. भारतात आजवर कोणत्याही संघाने चौथ्या डावात ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठलेले नाही, हे लक्षात घेता भारतीय संघासाठी हा सामना वाचवणे अत्यंत कठीण दिसत आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने सेनुरन मुथुस्वामीचे शतक आणि मार्को जॅन्सेनच्या ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर ४८९ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव केवळ २०१ धावांतच संपुष्टात आला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २८८ धावांची मोठी आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता २६ धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३१४ धावा झाली आहे.
भारतासमोर मोठे आव्हान
भारतातील खेळपट्ट्या चौथ्या आणि पाचव्या दिवसापर्यंत फलंदाजांसाठी अधिक आव्हानात्मक बनतात. त्यामुळे, येथील कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य फक्त एकदाच यशस्वीपणे गाठले गेले आहे. भारताने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ३८७/४ केल्या होत्या. त्यानंतर अजूनही कोणत्या संघाला ४०० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने नाबाद १०३ धावांचे शानदार शतक झळकावले तर, युवराज सिंगने नाबाद ८५ धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली होती. गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य दिल्यास, ऋषभ पंतच्या संघाला विजयासाठी नव्हे, तर फक्त पराभव टाळण्यासाठीही ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल.