India vs South Africa, 3rd T20I : धर्मशाला येथील मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ११७ धावांवर रोखले. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्या भेदक माऱ्यानंतर हार्दिक पांड्याने या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शंभर विकेट्सचा पल्ला गाठला. याशिवाय वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीतील जादू दाखवून देताना आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट कारकिर्दीत ५० विकेट्स पूर्ण केल्या. अखेरच्या षटकात बर्थडे बॉय कुलदीप यादवने २ विकेट्स घेत हवा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं अर्धशतक होण्याआधी अर्धा संघ तंबूत
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात नाणफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अर्शदीप सिंगनं पहिल्याच षटकात रीझा हेड्रिग्जच्या रुपात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर हर्षित राणानं क्विंटन डिकॉक आणि डेवॉल्ड ब्रेविसला बॅक टू बॅक ओव्हरमध्ये तंबूचा रस्ता दाखवत दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ७ धावा अशी बिकट केली. हार्दिक पांड्याने स्टब्सची विकेट घेत यात आणखी भर घातली. शिवम दुबेनं कॉर्बिन बॉशला आपल्या जाळ्यात अडकवलं. परिणामी अर्धशतकाच्या आत दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला.
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
पांड्याच्या सेंच्युरीसह वरुण चक्रवर्तीची 'फिफ्टी'
स्टब्सची विकेट आपल्या खात्यात जमा करताच हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत शंभर विकेट्स पूर्ण केल्या. त्यापाठोपाठ वरुण चक्रवर्तीनं ५० विकेट्सचा आकडा पार केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ शंभरीच्या आत आटोपण्याचे चित्र दिसत असताना एडन मार्करम याने अर्धशतकी खेळी करत संघाला शंभरी पार नेले. अखेरच्या षटकात बर्थ डे बॉय कुलदीप यादवनं २ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ११७ धावांवर ऑलआउट केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मार्करम याने ४६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.