भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर गोलंदाज उमेश यादवनं क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यानं फलंदाजीत कमाल दाखवताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही थक्क केले. त्याची फटकेबाज पाहून सहकारी अवाक् झाले आणि चाहत्यांनीही मनमुराद आस्वाद लुटला. उमेशनं 10 चेंडूंत 5 षटकार खेचून 31 धावा चोपल्या. त्यानं 310 च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 10+ चेंडूंचा सामना करून सर्वोत्तम स्ट्राईक रेट राखण्याचा पराक्रम उमेशनं केला. शिवाय त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
अजिंक्यने 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा केल्या. रोहित 255 चेंडूंत 28 चौकार व 6 षटकार खेचून 212 धावांत माघारी परतला. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि
रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.
रवींद्र जडेजाने 119 चेंडूंत 4 चौकारांसह 54 धावा केल्या.
मैदानावर येताच उमेशने पहिल्या दोन चेंडूवर खणखणीत षटकार खेचले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचणारा उमेश तिसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी 1948मध्ये फॉली विलियम्स यांनी इंग्लंडविरुद्ध, तर
सचिन तेंडुलकरने 2013साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचले होते.