बंगलोर : कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर तिसऱ्या टी-२० लढतीत द. आफ्रिकेला पराभूत करीत मालिका २-० ने खिशात घालण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.
धर्मशाळा येथे पहिला सामना पावसात वाहून गेल्यानंतर मोहालीतील दुसरा सामना ७ गड्यांनी जिंकून भारताने १-० ने आघाडी मिळविली होती. हा सामना जिंकून मालिका विजयासह कसोटी मालिकेआधी मानसिक आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
ऋषभ पंत याच्या कामगिरीकडे पुन्हा एकदा लक्ष असेल. द. आफ्रिका संघात अनेक युवा चेहरे असल्याने भारताविरुद्ध त्यांना झुंज द्यावी लागत आहे. मोहालीत कोहलीच्या फटकेबाजीपुढे पाहुण्या संघाचे गोलंदाज हतबल जाणवले. वॉशिंग्टन सुंदर आणि सैनीने आफ्रिकेच्या फलंदाजांची चांगलीच कोंडी केली.