भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी असेल खास; क्रिकेट बोर्डानेही केली सेलिब्रेशनची जय्यत तयारी, पण का?

भारतीय संघ आतापर्यंत एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे टीम इंडियापुढे हे मोठं आव्हान असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:39 PM2021-12-22T22:39:34+5:302021-12-22T22:40:39+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa 2nd Test will be special as CSA reveals special plans to celebrate 30 years of cricketing ties | भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी असेल खास; क्रिकेट बोर्डानेही केली सेलिब्रेशनची जय्यत तयारी, पण का?

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी असेल खास; क्रिकेट बोर्डानेही केली सेलिब्रेशनची जय्यत तयारी, पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa Test Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यातील पहिली कसोटी २६ ते ३० डिसेंबरला रंगणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघांना नववर्षाचं स्वागत करण्यासाठी विश्रांती मिळणार असून नवीन वर्षात ३ ते ७ जानेवारी दरम्यान दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. ही कसोटी दोन्ही देशांसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी खास असणार आहे. या कसोटीसाठी विशेष प्रकारची जय्यत तयारी करण्यात आली असून एका खास गोष्टीचं जंगी सेलिब्रेशनदेखील होणार आहे.

नक्की काय आहे सेलिब्रेशनमागचं कारण?

दक्षिण आफ्रिकेचा संघ १९७० ते १९९१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झाला होता. त्यांच्या संघात होत असलेल्या वर्णभेदामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्यावर कारवाई केली होती. अखेर १९९१ साली त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली. त्यावेळी पहिल्यांदा मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कोलकाताच्या मैदानात १९ नोव्हेंबरला १९९१ ला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध बंदीनंतरची पहिली कसोटी खेळली होती. तसेच, १९९२ साली अझरूद्दीनच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ आफ्रिकेतही मालिका खेळण्यासाठी गेला होता. त्यामुळे भारत-आफ्रिका यांच्यातील क्रिकेट संबंधांना ३० वर्षे पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दुसऱ्या कसोटीला खास महत्त्व देण्यात आले आहे.

दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांना ३० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दुसऱ्या कसोटीआधी खास सेलिब्रेशन केलं जाणार असल्याचं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये खेळण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांतील काही विशेष क्षणांना आणि व्यक्तींच्या आठवणींनी उजाळा देण्यात येणार असल्याचंही बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, भारताचा संघ आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या भूमिवर एकदाही कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे यंदाच्या मालिकेत हा इतिहास रचण्याच्या उद्देशाने विराटसेना मैदानात उतरेल यात वाद नाही. या मालिकेतील शेवटचा सामना ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा विराटचा १००वा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यालाही विशेष महत्त्व असेल. मात्र, या संपूर्ण मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोनाचं सावट आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता या निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: India vs South Africa 2nd Test will be special as CSA reveals special plans to celebrate 30 years of cricketing ties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.