केप टाऊन - दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेली तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. त्यामुळे शनिवारी होणारा तिसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार आहे. या लढतीसाठी दोन्ही संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, एकदिवसीय मालिकेत 5-1 अशा दणदणीत फरकाने विजय मिळवल्यानंतर टी-20 मालिकेसाठी विराटसेना सज्ज झाली आहे. आता या निर्णायक लढतीसाठी भारतीय संघात दोन फेरबदल होण्याची शक्यता असून, युझवेंद्र चहल आणि जयदेव उनाडकट यांच्या जागी कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्यापैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या युझवेंद्र चहलला पहिल्या दोन टी-20 सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या लढतीत क्लासेन आणि डुमिनीने त्याची गोलंदाजी झोडपून काढली होती. त्यामुळे निर्णायक लढतीसाठी चहलची संघातून गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्याजागी कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलला संघात स्थान मिळू शकते. या दोघांपैकी एकाला संघात घेतल्यास एका अतिरिक्त फलंदाजाची भर भारताच्या फलंदाजीमध्ये पडू शकते.
चहलप्रमाणेच वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटलाही दुसऱ्या टी-20 लढतीत फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. त्यामुळे त्यालाही निर्णायक लढतीमध्ये विश्रांती देऊन जसप्रीत बुमराह याला संघात स्थान देण्याचा विचार संघव्यवस्थापन करू शकते. बुमराहला संघात स्थान मिळाल्यास दुसऱ्या बाजूने जबरदस्त कामगिरी करत असलेल्या भुवनेश्वर कुमारला उत्तम साथ मिळू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या तुलनेत टी-20 मालिका बऱ्यापैकी चुरशीची झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या लढतीत दणदणीत विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती.