भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून (१४ नोव्हेंबर) कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर सुरू होत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने ईडन गार्डन्स मैदानाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. गिलसाठी हे मैदान नेहमीच खास राहिले आहे, कारण त्याची क्रिकेट कारकीर्द याच मैदानावरून सुरू झाली.
सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शुभमन गिल म्हणाला, "माझी ईडन गार्डन्स येथून आयपीएल कारकीर्द सुरू झाली आणि हे एक मैदान आहे. मी जेव्हा जेव्हा इथे येतो, तेव्हा मला पंजाबमध्ये असल्यासारखे वाटते. ही अशीच भावना आहे." ईडन गार्डन्स हे मैदान त्याला किती आपलेसे वाटते, हे त्याने या शब्दांतून सांगितले.
शुभमन गिलने या मैदानावर कसोटी सामना खेळण्याच्या आणि त्याचे नेतृत्व करण्याच्या उत्साहाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, "सहा वर्षांनंतर आम्ही येथे सामना खेळत आहोत. मला वाटते की, आम्ही या मैदानावर शेवटी पिंक बॉल कसोटी खेळलो. मी त्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हतो. पण संघाचा भाग होतो. त्यामुळे ईडन गार्डन्समध्ये हा माझा पहिला कसोटी सामना आहे आणि येथे माझ्या देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम असणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे."
शुभमन गिल आतापर्यंत केवळ एकदिवसीय आणि टी-२० मध्येच भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीच्या मैदानावर कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून उतरणे, हा त्याच्यासाठी एक भावनिक आणि महत्त्वाचा क्षण असणार आहे.