Join us  

India vs South Africa 3rd ODI: विजयाचा 'दीपक' लागलाच नाही! चहरची झुंजार खेळी व्यर्थ; आफ्रिकेचा भारताला 'क्लीन स्वीप'

दीपक चहरने अर्धशतकी खेळी करून भारताला विजयासमीप आणलं पण त्याला संघाला विजयी करता आलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 10:24 PM

Open in App

IND vs SA 3rd ODI Live Updates: अष्टपैलू दीपक चहरच्या झुंजार खेळीनंतरही भारताला वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रथम फलंदाजी करताना क्वींटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने २८७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतके केली होती. त्यानंतर योग्य वेळी दीपक चहरने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात ५ चेंडूत ५ धावा हव्या असताना युजवेंद्र चहल झेलबाद झाला आणि भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिका ३-०ने जिंकत टीम इंडियाला व्हाईटवॉश दिला.

२८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल ९ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी मिळून ९८ धावांची भागीदारी केली. शिखर धवन अर्धशतक (६१) झळकावून बाद झाला. ऋषभ पंत पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. नंतर विराटने डावाला गती दिली. पण तोदेखील अर्धशतकी खेळी (६५) करून माघारी परतला. सूर्यकुमार यादव (३९) आणि श्रेयस अय्यर (२६) यांच्याकडे छाप पाडण्याची संधी होती, पण ते दोघे बेजबाबदार फटके खेळून माघारी परतले. त्यानंतर दीपक चहरने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन झुंज दिली. त्याने ५४ धावांची खेळी केली. पण भारताला १० धावा हव्या असताना तो बाद झाला. त्याच्यानंतर मात्र आफ्रिकन गोलंदाजांनी चलाखीने गोलंदाजी करत भारताला मात दिली.

तत्पूर्वी, आफ्रिकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. नव्याने संधी मिळालेल्या दीपक चहरने झटपट दोन बळी टिपले. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद ७० होती. पण त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेन यांनी १४४ धावांची भागीदारी केली. डी कॉकने १२४ तर डुसेनने ५२ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतरही मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी छोट्या मोठ्या भागीजाकी करून संघाला २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून प्रसिध कृष्णाने ३, चहर आणि जसप्रीत बुमराहने २-२ तर युजवेंद्र चहलने १ बळी टिपला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादवशिखर धवन
Open in App