दक्षिण आफिकेविरूद्धच्या वन डे (Ind vs SA ODI Series) मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. दरम्यान, केएल राहुलकडे (KL Rahul) संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उपकर्णधारपदाची नवी जबाबदारी मिळाली. भारताचा वन डे आणि टी २० कर्णधार रोहित शर्मा हा अनफिट असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. कसोटी मालिकेआधी सराव करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली.
दरम्यान असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीये, परंतु त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषि धवन आणि तमिळनाडूचा फलंदाज शाहरूख खान यांच्या नावांचा समावेश आहे. ऋषि धवन आणि शाहरूख यांनी नुकत्याच विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. शाहरूखने आपल्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर तामिळनाडूला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं.
ऋषि धवननं आपल्या अष्टपैलू कामगिरीवर हिमाचल प्रदेशच्या संघाला विजय हजारे ट्रॉफी जिंकवली होती. त्यानं तामिळनाडूविरोधातील अंतिम सामन्यात ३ विकेट्स घेत ४७ धावाही केल्या होत्या. त्यानं टूर्नामेंटमध्ये ७६.३३ च्या सरासरीनं ४५८ धावा केल्या होत्या. तसंच उत्तम गोलंदाजी करत १७ विकेट्सही घेतल्या होत्या. तर दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हा या टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
'सबका टाईम आएगा'ऋषि धवन आणि शाहरूख खान यांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं नाही, यावर चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "निवड समितीच्या बैठकीत या खेळाडूंच्या नावावर चर्चा करण्यात आली. त्यांना यावेळी संघात स्थान देण्यात आलं नाही. परंतु दोन्ही खेळाडूंना लवकरच संघात स्थान देण्यात येईल," असंही ते म्हणाले. याशिवाय आवेश खान आणि हर्षल पटेल यांनाही संधी देणयात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कसा असेल भारतीय संघ?केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज