मँचेस्टर- विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात विजय शंकर याने मोक्याच्या वेळी दोन गडी बाद करत आपले कौशल्य सिद्ध केले. मात्र त्यामुळे आज सोशल मिडियावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी अंबाती रायुडूची मात्र चांगलीच फिरकी घेतली.
भारतीय संघात निवडीसाठी अंबाती रायुडू आणि विजय शंकर यांच्यात चुरस होती. मात्र निवडकर्त्यांनी विजय शंकरला पसंती दिली. त्यावेळी निवडकर्त्यांनी रायुडू थ्रीडी प्लेअर असल्याचे सांगत त्याचे कौतुुक केले होते. त्यावर चिडलेल्या अंबाती रायुडू याने आता मी विश्वचषकाचे सामने थ्रीडी ग्लासेस लावून पाहणार असल्याची टीका केली होती. याचाचा धागा पकडून आज विजय शंकर याने दोन बळी घेतल्यावर चाहत्यांनी अंबाती रायुडूची फिरकी घेतली आहे.
भुवनेश्वरकुमारला दुखापत झाल्यावर त्याच षटकातील दोन चेंडू टाकण्यासाठी विजय पुढे आला. त्याने पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला बाद केले. आणि नंतर अनुभवी आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला त्रिफळाचीत केले. त्याच्या या कामगिरीने खुश झालेल्या भारतीय चाहत्यांनी अंबाती रायुडूची मात्र फिरकी घेतली. त्यामुळे टिष्ट्वटरवर रायूडू ट्रोल होत आहे.