India Vs Pakistan, World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामना म्हटला की, सर्वप्रथम आठवतात त्या जावेद मियाँदादच्या माकड उड्या आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमीर सोहेलला दिलेले चोख उत्तर. पण, त्याचवेळी या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये झालेल्या सामन्यांतील काही वैयक्तिक खेळीही आजही स्मरणात आहेत. चला तर मग अशाच काही क्लासिक खेळींना उजाळा देऊया....
अजय जडेजानं केली वकार युनिसची धु धु धुलाई1996च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं 287 धावा चोपल्या. या सामन्यात अजय जडेजानं वकार युनिसनं टाकलेल्या 48व्या षटकात 22 धावा चोपून काढल्या आणि संघाला 8 बाद 287 धावांचा डोंगर उभा करून दिला. नवज्योत सिद्धूनं 93 धावांची खेळी केली खरी, परंतु जडेजाच्या 25 चेंडूंतील 45 धावांची खेळी भाव खावून गेली. जडेजानं 4 चौकार व 2 षटकार लगावले. भारताने हा सामना 39 धावांनी जिंकला होता.
सचिन तेंडुलकरचं क्लासिक उत्तर273 धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. वासीम अक्रम, वकार युनिस आणि शोएब अख्तर या आग ओतणाऱ्या गोलंदाजांना त्यानं पळता भुई करून सोडलं. तेंडुलकरनं 75 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून 98 धावांची खेळी साकारली. त्यानंतर राहुल द्रविड व युवराज सिंग यांनी भारताचा विजय पक्का केला.
वाहब रियाजचा दमदार स्पेल; भारताचा निम्मा संघ माघारी2011च्या वर्ल्ड कपमध्ये शोएब अख्तरला डावलून पाक संघात स्थान पटकावणाऱ्या वाहब रियाजने भारतीय संघाचे धाबे दणाणून सोडले होते. त्यानं 46 धावांत 5 फलंदाज बाद करून भारताला 9 बाद 260 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. त्यानं वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या महत्त्वाच्या खेळाडूंना तंबूची वाट दाखवली होती. मात्र, तरीही भारतानं विजय मिळवला होता.