आगामी टी२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "पाकिस्तानचा हा निर्णय भारतापेक्षा पाकिस्तानच्या स्वतःच्या क्रिकेट भविष्यासाठी अधिक घातक ठरेल," असे भाकीत कपिल पाजींनी वर्तवले आहे.
पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांचा संघ विश्वचषकात सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. बांगलादेशनेही सुरक्षा कारणास्तव भारत दौरा नाकारला होता, मात्र आयसीसीने त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतर पाकिस्तानने आता थेट सामन्यावरच बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलले आहे.
कपिल देव यांचा पीसीबीला इशारा
एका माध्यम संवादादरम्यान कपिल देव यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आरसा दाखवला. ते म्हणाले, "हा केवळ राजकारणाचा किंवा प्रतिमेचा प्रश्न नाही, तर थेट तरुण क्रिकेटपटूंच्या करिअरचा प्रश्न आहे. जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला असेल, तर त्यांनी समोर येऊन तसे सांगावे. पण जर बोर्ड सांगत असेल की तुम्ही खेळू नका, तर यामुळे तुमच्या देशाची प्रतिष्ठा खालावते."
कपिल देव यांनी पुढे इशारा दिला की, "वारंवार मागे हटणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे पाकिस्तान क्रिकेट जगापासून वेगळे पडेल. तुम्ही केवळ एका सामन्यावर बहिष्कार टाकत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या क्रिकेटपटूंची एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त करत आहात. पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अजिबात चांगली नाही."
नुकसान कुणाचे?
भारत-पाकिस्तान ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. पाकिस्तानने सामना न खेळल्यास भारताला थेट विजय मिळेल, मात्र पाकिस्तानला जागतिक स्तरावर आर्थिक आणि क्रीडाविषयक निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो. कपिल देव यांच्या मते, पाकिस्तान क्रिकेट सध्या अशा वळणावर आहे जिथे एक चुकीचा निर्णय त्यांना क्रिकेटच्या नकाशावरून पुसून टाकू शकतो.