आगामी आयसीसी टी२० पुरुष विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषकात सहभागी होण्याची परवानगी दिली असली, तरी १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या महामुकाबल्यावर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे आयसीसी संतापली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा केवळ खेळ नसून तो जागतिक क्रिकेटसाठी कमाईचा सर्वात मोठा स्रोत आहे. हा सामना रद्द झाल्यास ब्रॉडकास्टर्स, जाहिरातदार आणि तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे २,३०० कोटी रुपये) महसुलावर पाणी फेरले जाईल. आयसीसी आणि पीसीबीचे माजी कम्युनिकेशन्स प्रमुख समी-उल-हसन बर्नी यांनी या सामन्याच्या आर्थिक महत्त्वाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "जोपर्यंत नुकसानीचा प्रश्न आहे, भारत-पाकिस्तान सामन्याची किंमत सुमारे $२५० दशलक्ष किंवा ₹२,२८८ कोटींपेक्षा जास्त असते. यामध्ये केवळ प्रसारकच नाही तर सर्व आर्थिक पैलूंचा समावेश आहे. पाकिस्तानचे वार्षिक उत्पन्न सुमारे $३५.५ दशलक्ष किंवा ₹३२५ कोटी आहे, त्यामुळे हा फरक खूप मोठा आहे."
दंडाची टांगती तलवार: आयसीसीच्या 'सदस्य सहभाग करारा'नुसार (MPA), जर एखादा देश राजकीय कारणास्तव सामना खेळण्यास नकार देत असेल, तर त्या नुकसानीची सर्व भरपाई संबंधित क्रिकेट बोर्डाकडून (PCB) वसूल केली जाऊ शकते. पीसीबीचे वार्षिक उत्पन्नच एवढे आहे की हा दंड भरण्यासाठी पीसीबीला पुढची आठ-दहा वर्षे लागतील. परंतू, हा दंड भरण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत रहायला हवा.
भारताला मिळणार 'वॉकओव्हर'
आयसीसीच्या नियमांनुसार, जर पाकिस्तानचा संघ १५ फेब्रुवारीला मैदानात उतरला नाही, तर टीम इंडियाला थेट 'वॉकओव्हर' दिला जाईल. यामुळे भारताला २ गुण मिळतील, तर पाकिस्तानचा 'नेट रन रेट' (NRR) मोठ्या प्रमाणात घसरून त्यांना स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण होईल.
आयसीसीचा इशारा: "हा खेळाच्या अखंडतेवर हल्ला"
आयसीसीने या प्रकरणावर अधिकृत पत्रक जारी करत म्हटले आहे की, "निवडक सहभाग हा जागतिक स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांविरुद्ध आहे. यामुळे स्पर्धेच्या पवित्रतेला धक्का पोहोचतो." आयसीसीने पीसीबीला या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे. यामध्ये पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबन किंवा भविष्यातील आयसीसी महसुलात कपात यांसारख्या कारवाईचा समावेश असू शकतो.