चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील नो हँडशेक वादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट युद्ध यापुढेही सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताच्या 'नो हँडशेक' धोरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. "जर त्यांना हात मिळवायचा नसेल, तर आम्हालाही त्याची कोणतीही विशेष गरज नाही. आता मुकाबला बरोबरीच्या स्तरावर होईल," असे खळबळजनक विधान नक्वी यांनी केले आहे.
पाकिस्तान आता बचावात्मक पवित्रा घेणार नाही, असे नक्वी यांनी म्हटले आहे. "असे कधीच होऊ शकत नाही की भारताने काहीतरी करावे आणि आम्ही शांत बसून मागे हटावे. प्रत्येक कृतीला आता चोख प्रत्युत्तर दिले जाईल," असे सांगत त्यांनी बीसीसीआयला इशारा दिला आहे. कराचीमध्ये पत्रकारांना नक्वी यांनी ही मुलाखत दिली आहे.
पंतप्रधानांचा सल्ला आणि राजकारण
नक्वी यांनी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप भारतावर केला आहे. ते म्हणाले, "आमची आजही हीच धारणा आहे की क्रिकेट आणि राजकारण एकत्र करू नये. खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला दोनदा सांगितले आहे की, खेळाला राजकारणापासून दूर ठेवा. मात्र, समोरून प्रतिसाद मिळत नसेल, तर आम्ही आमचा सन्मान पणाला लावणार नाही."
पहलगाम हल्ला, नंतर ऑपरेशन सिंदूर अन् आशिया कप...
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता करण्यासाठी भारतीय सैन्याने सीमेपलीकडे 'ऑपरेशन सिंदूर' ही मोठी लष्करी मोहीम राबवली होती. दहशतवाद आणि क्रिकेट एकाच वेळी चालू शकत नाही, ही भूमिका भारताने आता प्रत्यक्ष कृतीत आणली होती. सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपपासून भारतीय पुरुष आणि महिला अशा दोन्ही क्रिकेट संघांनी पाकिस्तानी खेळाडूंशी 'हात मिळवण्यास' स्पष्ट नकार दिला होता. एवढेच नाही तर भारतीय संघाने नक्वींच्या हस्ते आशिया कप घेण्यासही नकार दिला होता. भारताचा हा स्टँड नुकत्याच झालेल्या अंडर १९ कपमध्ये देखील दिसला. भारतीय संघाने उपविजेत्याची ट्रॉफी नक्वींच्या हस्ते घेण्यास नकार दिला होता.