T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तान संघानं वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर पहिल्या विजयाची नोंद केली. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाकिस्तानला १० विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला. शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीलाच धक्के दिल्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं १५१ धावा केल्या. पण, पाकिस्तानला विजय मिळवण्यापासून रोखण्यासाठी त्या पुरेशा ठरल्या नाही. भारतीय गोलंदाजांना सपशेल अपयश आलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांनी बाबर आजम अँड कंपनीचं अभिनंदन केलं, पण आज त्यांनी वादग्रस्त विधान करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.
''पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आजमचे अभिनंदन. रिझवान व शाहिन आफ्रिदी यांचेही कौतुक. देशाला तुमचा अभिमान!.''असे इम्रान खान यांनी ट्विट केलं होतं.
आज ते म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावेत, अशी माझी इच्छा आहे. पण, आता वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करल्यानंतर संबंध सुधारण्याबाबतच्या चर्चेसाठीची ही योग्य वेळ नाही.
सामन्यात काय झाले?
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.
भारताचा दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्घ होणार आहे.