India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताचा हा पाकिस्तानवरील सातवा विजय ठरला. भारताच्या 336 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसामुळे अनेकदा खेळ थांबवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने 35 षटकांत 6 बाद 166 धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती. पण, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी एक वाईट बातमी आहे.
![]()
भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतीमुळे माघारी परतला होता. दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्वर पुन्हा मैदानावर परतला नाही. भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटकं टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. भुवीच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीनं महत्त्वाची बातमी दिली. तो म्हणाला,'' भुवीचा पाय मुरगळला आहे. त्यामुळे कदाचित तो दोन ते तीन सामन्यांत खेळणार नाही. पण, तो पुनरागमन करेल. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला पर्यायी खेळाडू म्हणून आमच्याकडे मोहम्मद शमी हा सक्षम पर्याय आहे.''
![]()
भारतीय संघ पुढील सामन्यांत अफगाणिस्तान ( 22 जून), वेस्ट इंडिज ( 27 जून) आणि इंग्लंड ( 30 जून) यांचा सामना करणार आहे. भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी सलामीवीर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती आणि त्यालाही तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यावेळी कोहलीनं हिटमॅन रोहित शर्माचे कौतुक केले. तो म्हणाला,'' रोहितची खेळी अविश्वसनीय होती. तो वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू का आहे, हे त्याने दाखवून दिले. लोकेश राहुलनंही त्याला सुरेख साथ दिली. कुलदीप यादवचे कौतुक करावं तितकं कमी. बाबर व फखर या डोईजड खेळाडूंना त्यानं माघारी पाठवून आमच्या विजयाचा मार्ग सुरक बनवला.''