Abhishek Sharma Batting IND vs PAK Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले. सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. फरहानच्या ५८ धावांच्या जोरावर पाकिस्तानने भारताला १७२ धावांचे आव्हान दिले होते. पण सलामीवीर अभिषेक शर्माच्या धडाकेबाज ७४ धावांच्या खेळीपुढे पाकिस्तानी गोलंदाजांचा निभाव लागला नाही. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंनाही अभिषेकने अस्मान दाखवले. त्याच्या खेळीचे चक्क पाकिस्तानातूनही कौतुक होत आहे.
अभिषेक शर्माची प्रतिभा पाकिस्तानी माध्यमांनाही मान्य करावी लागली. गट फेरीच्या सामन्यात अभिषेक शर्मा ३१ धावा करून बाद झाला होता. पण रविवारच्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत ७४ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. त्याने तब्बल १८९ च्या स्ट्राईक रेटने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या फटकेबाजीचे पाकिस्तानच्या पत्रकारांनीही तोंडभरून कौतुक केले. 'अशी धुलाई कधीच पाहिली नाही.. ७ षटकात बिनबाद ८५' असे ट्विट प्रसिद्ध पाकिस्तानी क्रीडा पत्रकार रिझवान हैदर यांनी केले. तसेच, अभिषेक बाद झाल्यावरही त्यांनी लिहिले की, अभिषेक आऊट झाला पण पाकिस्तानची धुलाई करून गेला, खूपच प्रतिभावान खेळाडू, असेही लिहिले.
पाकिस्तानातील दुसरे एक वरिष्ठ क्रीडा पत्रकार सोहेल इम्रान यांनीही पाकिस्तानची टीका केली. "टॉसच्या आधी असो किंवा सामना संपल्यावर असो.. हस्तांदोलन झाले की नाही हा मुद्दा बाजूला ठेवा. भारतीय संघ अप्रतिम खेळला आणि आपण ते स्वीकारायलाच हवे. शाहीन आफ्रिदी ३.५ षटकात ४० धावा यावरूनच कळते की भारतीय फलंदाजांनी कशी धुलाई केली," असे इम्रान यांनी एक्स पोस्ट केली.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या संघाचे आता २-२ सामने शिल्लक आहेत. जर दोन्ही संघांनी सुपर ४ मधील उर्वरित सर्व सामने जिंकले, तर २८ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी पुन्हा आमनेसामने दिसतील.