मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला रंगतदार झालेल्या उपांत्य लढतीत भारतीय संघाला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 45 मिनिटांत केलेल्या खराब खेळामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराटने भारतीय संघाच्या कामगिरीवर सविस्तर भाष्य केले, ''240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करू, असा आम्हाला विश्वास होता. मात्र पहिल्या 45 मिनिटांत केलेल्या खराब खेळामुळे आम्ही सामना गमावला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे पहिल्या 40-45 मिनिटांच्या काळात सामना आमच्या हातातून निसटला.
![]()
यावेळी बेदरकारपणे फटकेबाजी करून बाद झालेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याचाही विराटने बचाव केला. पंत आणि पांड्याने चांगला खेळ केला होता. पण त्यांची फटक्यांची निवड चुकली. ते तरुण आहेत. तरुणपणी माझ्याकडूनही अशा चुका झाल्या होत्या. त्यांच्यात गुणवत्ता आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरणे योग्य ठरणार नाही.'' असे विराट म्हणाला. तसेच खालच्या फळीत डावाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आम्ही धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्याची योजना आखली होती. त्यामुळेच आज धोनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीस आला, असेही त्याने सांगितले.