मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला 8 बाद 239 धावांवर रोखले. या सामन्यात रवींद्र जडेजाच्या समावेशावरून समालोचक संजय मांजरेकरसह काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. पण, जडेजानं आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांची बोलती बंद केली. जडेजानं या सामन्यात 10 षटकांत 34 धावा देत एक विकेट घेतली, शिवाय त्यानं रॉस टेलरला धावबाद करून भारताला मोठे यश मिळवून दिलं. या कामगिरीसह जडेजानं वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा मान मिळवला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षक म्हणून जडेजानं अव्वल स्थान पटकावले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या.
बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या.