Join us
Daily Top 2Weekly Top 5

India Vs New Zealand World Cup Semi Final : उपांत्य सामन्यात व्यत्यय आला, तर काय सांगतात आयसीसीचे नियम...

राखीव दिवशी सामना नव्याने सुरु होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:15 IST

Open in App

मँचेस्टर, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत पाऊस पडला आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. जेव्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा न्यूझीलंडची ५ बाद २११ अशी स्थिती होती. पण जेव्हा सामन्यात व्यत्यय येतो, तेव्हा आयसीसीने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहे. आयसीसीचे हे नियम नेमके आहेत तरी काय, ते जाणून घ्या...

उपांत्य फेरीत जर पाऊस पडला आणि पूर्ण दिवस सामना होऊ शकला नाही किंवा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर आज सामना झाला नाही तर उद्या हा सामना पुन्हा खेळवण्यात येऊ शकतो. पण राखीव दिवशी सामना नव्याने सुरु होणार नाही, तर आता जी सामन्याची स्थिती आहे त्यानुसारच राखीव दिवशी सामना सुरु होणार.

जर उपांत्य फेरीची लढत बरोबरीत सुटला तर कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होणार, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. जर उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यामध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक देण्यात येईल. या सुपर ओव्हरमध्ये जो सामना जिंकेल, तो अंतिम फेरीत पोहोचेल.

पावसामुळे जर हा सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागते. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे या सामन्याचा निकाल महत्वाचा ठरत नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामना चौथ्या स्थानावर आहे.त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्यामुळे हा सामना जर रद्द झाला तर त्यामध्ये न्यूझीलंडचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारताला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

अंतिम सामना जर पावसामुळे रद्द करण्यात आला तर कोणता संघ विजेता ठरेल, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर विश्वचषक दोन्ही संघांना विभागून देण्यात येईल.

टॅग्स :आयसीसीवर्ल्ड कप 2019