मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : उपांत्य लढतीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या लढतीत न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मधल्या फळीतील ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या बेदरकार फटकेबाजी करून बाद झाले. पंत आणि पांड्याने केलेल्या चुकांबाबत सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोलहीकडे विचारणा केली असता विराट कोहलीने त्यांच्या खेळाचा बचाव केला.
न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट म्हणाला की,'' पंत आणि पांड्याने चांगला खेळ केला होता. पण त्यांची फटक्यांची निवड चुकली. ते तरुण आहेत. तरुणपणी माझ्याकडूनही अशा चुका झाल्या होत्या. त्यांच्यात गुणवत्ता आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरणे योग्य ठरणार नाही.'' असे विराट म्हणाला.
''240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करू, असा आम्हाला विश्वास होता. मात्र पहिल्या 45 मिनिटांत केलेल्या खराब खेळामुळे आम्ही सामना गमावला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे पहिल्या 40-45 मिनिटांच्या काळात सामना आमच्या हातातून निसटला.