मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात होईल. आज सूर्यानंही दर्शन दिलं असून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून सरावही केला. पण, सामन्यात पावसाचा असाच व्यत्यय होत राहिल्यास, खेळाडूंनी काय करावं यासाठीचा एक फंडा युवराज सिंगनं सुचवला आहे.
भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज युवराजनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आता कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल टेव्ंटी-20 लीगमध्ये खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामन्याचा एक दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर आज राखीव दिवशी उर्वरित खेळ होणार आहे. पण, पावसाचा सतत व्यत्यय खेळाडूंची मानसिक कसोटी पाहणारा असतो, असे मत युवीनं व्यक्त केलं. त्यानं ट्विट केलं की,''पावसाचा सततचा खोडा खेळाडूंचे चित्त विचलित करणारा असतो. त्यामुळे अशा वेळ स्वतःला प्रेरणा देत राहणं महत्त्वाचं असतं. पण, वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळाडू आपोआप प्रेरित होतात. भारतीय संघाला शुभेच्छा.''