कानपूर : ‘भारताविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी परिस्थिती पाहून तीन फिरकी गोलंदाजांना अंतिम संघात स्थान देण्यात येईल,’ असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कानपूर आणि मुंबई येथे चांगल्या खेळपट्ट्या मिळतील, असा विश्वासही स्टीड यांनी व्यक्त केला.
स्टीड म्हणाले की, ‘अनेक संघ भारतात येतात, पण विजय मिळवण्यात त्यांना यश मिळत नाही. याचे कारण जाणून घेतले पाहिजे. यावरूनच भारत दौरा किती आव्हानात्मक असतो, हे कळून येईल.’ यावेळी स्टीड यांनी मुंबईत जन्मलेल्या एजाझ पटेलचे अंतिम संघातील स्थान पक्के असल्याचे संकेतही दिले. ते म्हणाले की, ‘चार वेगवान गोलंदाज आणि एक पर्यायी फिरकीपटू घेऊन खेळण्याची आमची पारंपरिक योजना येथे यशस्वी ठरणार नाही. या सामन्यात तुम्ही आम्हाला तीन फिरकी गोलंदाजांसह खेळताना पाहू शकाल. खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल.’
इंग्लंडच्या भारत दौऱ्यादरम्यान ज्या खेळपट्ट्या होत्या, त्याविषयी मैदान कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार का, असे विचारले असता स्टीड म्हणाले की, ‘तशी चर्चा करावी लागेल असे वाटत नाही. परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक आहे. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळीही आहे. इंग्लंडला एकाच मैदानावर दोन कसोटी सामने खेळावे लागले होते, तर आम्ही दोन्ही सामने वेगवेगळ्या मैदानावर खेळणार आहोत. कानपूरला काळी माती आहे, तर मुंबईत लाल माती असेल. त्यानुसार आम्ही योजना आखत आहोत.’