Join us

India vs New Zealand ODI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बदलाचे वारे, चौथ्या सामन्यासाठी संघात नवीन चेहरे

India vs New Zealand ODI : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 10:24 IST

Open in App
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड चौथा वन डे सामना गुरुवारीविराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारीभारतीय संगात तीन बदल अपेक्षित

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. कर्णधार कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली हॅमिल्टन येथे होणाऱ्या सामन्यात संघात तीन बदल अपेक्षित मानले जात आहेत. कोहलीच्या विश्रांतीमुळे रिक्त झालेल्या जागेवर युवा खेळाडू शुबमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी शुबमनची दावेदारी पक्की मानली जात आहे. कॅप्टन कोहलीनेही 19 वर्षीय शुबमनचे तोंडभरुन कौतुक केले आहे. तिसऱ्या वन डे सामन्याला मुकलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुरुवारी मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी त्याने संघासोबत कसून सरावही केला. 

धोनीच्या पुनरागमनाने दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू किंवा केदार जाधव यांच्यापैकी एकाला बाकावर बसावे लागेल. हे तिघेही चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे माहीसाठी संघात स्थान निर्माण करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला एका खेळाडूला संघाबाहेर करावे लागेल. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने 4 ते 6 क्रमांकाच्या फलंदाजीसाठी चाचपणी सुरू आहे. कोहलीने रायुडूला पसंती दर्शवली आहे आणि जाधव अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोख पार पाडत आहे. त्यामुळे कार्तिकला वेट अॅण्ड वॉच करावा लागेल.

पहिल्या तीनही सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी गोलंदाज खलील अहमदला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून शमी सातत्याने खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. भुवनेश्वर कुमार आणि खलील मुख्य गोलंदाजांची भूमिका बजावतील, तर हार्दिक पांड्या त्यांना साहाय्य करेल. रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. त्यामुळे कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल यांच्यापैकी एक संघाबाहेर होऊ शकतो. 

असा असेल संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद, कुलदीप यादव. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहलीशुभमन गिलमहेंद्रसिंह धोनीकेदार जाधवदिनेश कार्तिकरवींद्र जडेजाकुलदीप यादवयुजवेंद्र चहल