- व्हीव्हीएस लक्ष्मण
न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारतीय संघाला कोंडीत पकडेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. यासाठी त्यांच्यावर दडपणही होते, पण भारताने त्यांनाच कोंडीत पकडून दणदणीत मात केली. भारताने प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यावर वरचष्मा गाजवला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे मी फार प्रभावीत झालो. दणकेबाज फलंदाजांवर त्यांनी वर्चस्व गाजविले. गोलंदाजांच्या देहबोलीत आक्रमकता होती. आता यजमान खेळाडू भारतीय खेळाडूंचे अनुकरण करीत असल्याचे वृत्त वाचून बरे वाटले.
भारताचे दोन्ही फिरकी गोलंदाज चमत्कार करणारे ठरले, त्यांनी लहान सीमारेषेचा बचाव करीत फ्लाईट चेंडूंवर फलंदाजांना चकविले. या गोलंदाजांमध्ये वेग कमी असेल पण प्रतिस्पर्धी फलंदाजांना ते बॅकफूटवर खेळण्याची देखील संधी देत नाहीत.
केन विलियम्सन, रॉस टेलर आणि टॉम लाथम यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज भारतीय मारा समजू शकले असे वाटत नाही. विश्वचषकातही भारताचे मधल्या षटकात हेच धोरण राहील, असे दिसते. नव्या चेंडूवर भुवनेश्वर आणि मोहम्मद शमी यांचा मारा फारच भेदक वाटतो. पाठोपाठ स्पेल टाकणाऱ्या या दोन्ही वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसचा स्तर सुधारल्याचे लक्षात येते. यामुळे भारताला बुमराहची उणीव जाणवली नाही.
मधल्याफळीने दिलेले सातत्यपूर्ण योगदान हे वन डे मालिकेचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. आघाडीचे तिन्ही फलंदाज प्रतिभावान आहेत. याशिवाय धोनी, जाधव, रायुडू आणि कार्तिक यांच्याही योगदानाचा लाभ झाला. आघाडीच्या सहा फलंदाजांनी जे सातत्य दाखवले त्यामुळे पहिल्या सहा स्थानावर आणखी कुणाची वर्णी लागेल, असे वाटत नाही. विश्वचषकाआधी झालेला हा स्वागतार्ह बदल म्हणावा
लागेल.
या मालिकेचा निर्णय आधीच लागला आहे. आता भारताचे टार्गेट विदेशात क्लीन स्वीप करणे हे असेल. ही मोठी उपलब्धी ठरावी. विराटला विश्रांती देण्यात आली असली तरी सध्याचा संघ त्यामुळे जराही कमकुवत झालेला नाही. रोहित शर्माने विराट कोहलीची उणीव जाणवू न देता अनेकदा चांगला खेळ केला आहे. दुसरीकडे न्यूझीलंड संघ मात्र मुसंडी मारेल, असे कुठलेही चित्र आजतरी पहायला मिळत
नाही.