Join us

India Vs New Zealand, Latest News : उपांत्य फेरीत 'या' दोन खेळाडूंना संघात ठेवाच; सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला सल्ला

India Vs New Zealand, Latest News, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 11:24 IST

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीच्या मार्गात त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. हे दोन संघ यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच आमनेसामने येणार आहे. साखळी फेरीत उभय संघाचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  

भारतीय संघाने 9 सामन्यांत 7 विजय मिळवले आहेत, तर एक पराभव व एक सामना रद्द झाला होता. भारतीय संघाने 15 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडच्या खात्यात 11 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. किवींनी पाच सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे प्रथमच हे संघ या स्पर्धेत समोरासमोर येणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडियानं रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना अंतिम अकरात खेळवावे, असा सल्ला तेंडुलकरने दिला आहे.

जडेजाला श्रीलंकेविरुद्ध यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात जडेजानं 10 षटकांत 40 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानं पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लंकेच्या कुशल मेंडिसला बाद केले. तेंडुलकर म्हणाला,''भारतीय संघात सहावा गोलंदाज आणि अतिरिक्त फलंदाज म्हणून जडेजाचा पर्याय मी संघ व्यवस्थापकांसमोर ठेवू इच्छितो. दर दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर त्याच्या जागी जडेजा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मोठ्या सामन्यात हाताशी एक अतिरिक्त गोलंदाज असणे महत्त्वाचे आहे.''

इंग्लंडविरुद्ध मोहम्मद शमी महागडा ठरला होता. त्यानं 68 धावा देत 1 विकेट घेतली होती. पण, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध चार विकेट घेतल्या. तेंडुलकरने शमीसाठीही फलंदाजी केली. तो म्हणाला,''वेस्ट इंडिजविरुद्ध शमीने सुरेख गोलंदाजी केली होती आणि त्याच मैदानावर आता न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शमीचा येथील अनुभव संघाच्या कामी येईल. ''  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019सचिन तेंडुलकरमोहम्मद शामीरवींद्र जडेजाभारतन्यूझीलंड