India vs New Zealand 3rd T20I India chase down 154 in 10 overs clinch series 3-0 : अभिषेक शर्माची वादळी खेळी आणि सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून आलेल्या सलग दुसऱ्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक नोंदवत टी-२० मालिका खिशात घातली आहे. टी-२० क्रिकेटमधील आपला दबदबा कायम ठेवताना टीम इंडियानं गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर विक्रमांची 'बरसात' करत नव्या वर्षात सलग नवव्या मालिका विजयाचा डाव साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मा आणि सूर्याचे वादळी अर्धशतक; टीम इंडियाने १० षटकातच संपवली मॅच
तिसऱ्या आणि 'करो वा मरो'च्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियासमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. संजू सॅमसन गोल्डन डकचा शिकार झाला. पण त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या इशान किशन याने छोटीखानी पण धमाकेदार खेळी करत न्यूझीलंड गोलंदाजांचे खांदे पाडले. १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावा करून तो बाद झाला. मग अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडीनं नाबाद अर्धशतकीसह १० व्या षटकातच मॅच संपवली.
६० चेंडू आणि ८ विकेट्स राखून सामना जिंकत टीम इंडियाने मालिका घातली खिशात
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं १४ चेंडूत अर्धशतक झळकावत भारताकडून टी-२० मधील दुसऱ्या सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात त्याने २० चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला भारतीय टी-२० संघाच्या कर्णधाराने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची नाबाद खेळी करत संघाला ८ विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका ३-० अशी आपल्या नावे केली आहे. आता उर्वरित दोन्ही सामने जिंकत वर्ल्ड कप आधी मोठा धमाका करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.
T20 वर्ल्ड कप २०२४ नंतर भारतीय संघाचा विजयी सिलसिला कायम
- विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४ (४-१)
- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२४ ( २-०)
- विरुद्ध आयर्लंड, २०२४ (३-१)
- विरुद्ध अफगाणिस्तान, २०२४ (३-१)
- विरुद्ध झिम्बाब्वे, २०२५ (४-१)
- आशिया कप, २०२५ — विजेते
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२५ (२-१)
- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२५ (३-१)
- विरुद्ध न्यूझीलंड, २०२६ (३-०) (दोन सामने बाकी)
१५०+ धावांचा पाठलाग करताना पूर्ण सदस्य (FM) संघाविरुद्ध सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून विजय
- ६० चेंडू – भारत vs न्यूझीलंड, गुवाहाटी २०२६*
- ३७ चेंडू – वेस्ट इंडिज vs दक्षिण आफ्रिका, किंग्स्टन २०२४
- ३३ चेंडू – इंग्लंड vs पाकिस्तान, लाहोर २०२२
- ३२ चेंडू – दक्षिण आफ्रिका vs इंग्लंड, जोहान्सबर्ग २०१६
Web Summary : India defeated New Zealand, securing a series victory with a dominant performance. Abhishek Sharma's explosive innings and Suryakumar Yadav's consistent form led India to chase down the target in just 10 overs, achieving a record-breaking win and continuing their winning streak.
Web Summary : भारताने न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीमुळे आणि सूर्यकुमार यादवच्या सातत्यपूर्ण फॉर्ममुळे भारताने केवळ १० षटकांत लक्ष्य गाठले, ज्यामुळे विक्रमी विजय मिळवला आणि विजयाची मालिका कायम राखली.