ठळक मुद्देरोहित शर्माने 21वी धाव घेताच एक विक्रम नावावर केला. कोहली, गांगुली, तेंडुलकरनंतर रोहितच
माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : पुन्हा एकदा गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडच्या संघाला कोंडीत पकडले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही न्यूझीलंडला तिसऱ्या वन डे सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यांचा संपूर्ण संघ 243 धावांत तंबूत परतला. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनने आक्रमक खेळ केला, परंतु धावफलकावर 39 धावा असताना तो माघारी परतला. रोहित शर्माने एका बाजूने संयमी खेळी केली. त्याने 21वी धाव घेताच एक विक्रम नावावर केला.
भारतीय संघाने पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजीचा नजराणा पेश केला आणि न्यूझीलंडचा संघ 243 धावांवर माघारी पाठवला. मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. माफक लक्ष्य लवकर पार करून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू मैदानावर उतरले. सलामीवीर धवनने 27 चेंडूंत 6 चौकार लगावत 28 धावा केल्या. त्याची फटकेबाजी सुरू असताना रोहित दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करत होता.
ट्रेंट बोल्टने 9 व्या षटकात धवनला बाद केले आणि रोहितने सामन्याची सूत्र हातात घेतली. त्याने कोणतीही घाई न करता धावफलक हलता ठेवला. त्याने 21वी धाव घेताच एक विक्रम नावावर केला. त्याने लिस्ट A क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम केला. भारताकडून लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत विराट कोहली 219 डावांसह आघाडीवर आहे, तर सौरव गांगुली ( 252) आणि
सचिन तेंडुलकर ( 257) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. रोहितला हा पल्ला गाठण्यासाठी 260 डाव खेळावे लागले.