Join us

Ind Vs Eng : कुलदीप यादवला का खेळवलं नाही? विराट कोहलीनं दिलं उत्तर...

India vs England, 1st Test : चेन्नई कसोटीत कुलदीप यादवला न खेळवल्याबद्दल भारतीय संघावर होतेय जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 17:08 IST

Open in App

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत (India vs England Test) मानहानीकारक पराभवला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात तब्बल २२७ धावांनी पराभव झाला. इंग्लंडने दिलेल्या ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ कसोटीच्या शेवटच्या दिवशी १९२ धावांवर गारद झाला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या पराभवानंतर संघाच्या निराशाजनक कामगिरीबाबत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यात भारताच्या संघ निवडीबाबत सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Virat Kohli On Not Playing Kuldeep Yadav in Chennai Test)

भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला संघात स्थान न दिल्याबाबत कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच आश्वर्य व्यक्त केलं गेलं. आता संघाच्या पराभवानंतर यावरुन संघ निवडीबाबत टीका होऊ लागली आहे. कुलदीप यादवच्या जागी या सामन्यात शाहबाज नदीम याला संधी देण्यात आली. नदीमनं या सामन्याच चार विकेट्स घेतल्या पण त्याच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावा देखील वसुल केल्या आहेत. इतकंच नव्हे, तर त्यानं अनेक नोबॉल देखील टाकले. पण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं नदीमच्या निवडीला पाठिंबा दिला आहे. 

चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video

गेल्या दोन वर्षांपासून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या कुलदीप यादवची इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवड होणं जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण सामन्याची नाणेफेक झाल्यानंतर भारतीय संघानं जाहीर केलेल्या अंतिम ११ जणांमध्ये त्याचं नाव नसल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला आणि त्यावर चर्चा देखील होऊ लागली. दरम्यान, कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनं नदीमच्या निवडीबाबत बचावात्मक पवित्रा घेतला. "नदीमच्या निवडीबाबत कोणतीही खंत नाही. जर कुलदीपला संघात जागा दिली असती तर संघात तीन असे फिरकीपटू झाले असते की जे चेंडू फलंदाजाच्या आतल्या बाजूस वळवू शकतात. त्यामुळे गोलंदाजीत आम्हाला वैविध्य राखणं कठीण होऊन बसलं असतं. पुढच्या कसोटीत आम्ही याबाबत पुन्हा विचार करू आणि वैविध्य राखून बदल करता येतील का याबाबत चर्चा केली जाईल", असं कोहली म्हणाला आहे. 

टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरण

भारतीय संघ चेन्नई कसोटीत ३ फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. फिरकी गोलंदाजीची धुरा आर.अश्विनच्या खांद्यावर होती. तर त्याची साथ देण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम होते. अश्विनने आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्यात एकूण ९ बळी मिळवले. यातील ६ बळी अश्विनने दुसऱ्या डावात घेतले आहेत. दुसऱ्याबाजूला नदीम आणि सुंदरने निराशा केली. नदीमने दोन्ही डावात मिळून एकूण ४ विकेट्स घेतले. पण हे बळी मिळविण्यासाठी नदीमला ५९ षटकं टाकावी लागली यात २३० धावा देखील दिल्या आहेत. यात नदीमनं फक्त ६ निर्धाव षटकं टाकली. नदीमच्या गोलंदाजीत यावेळी शिस्तीचा अभाव देखील पाहायला मिळाला. त्यानं एकूण ९ नोबॉल टाकले. 

तारे जमी पर!; टीम इंडियाचा इंग्लंडकडून दारूण पराभव

दुसऱ्याबाजूला वॉशिंग्टन सुंदरला दोन्ही डावात एकही विकेट घेता आली नाही. दोन्ही डावांमध्ये मिळून त्यानं २७ षटकं टाकली. पण फलंदाजीत सुंदरने पहिल्या डावात नाबाद ८५ धावांची खेळी साकारली होती. 

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय