India vs England : मँचेस्टर कसोटी रद्द केल्यानंतर इंग्लंडचे माजी खेळाडू, इंग्लिश मीडिया सातत्यानं टीम इंडियावर आरोप करतान रोज नवनवीन दावे करताना दिसत आहेत. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी बीसीसीआयनं भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रद्द केल्याचा आरोपही केला गेला. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ( ECB) आयपीएल आणि कसोटी रद्द होणे, यात दुरान्वये काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तरीही इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड गोवर ( David Gower) यांनी विराट कोहलीचं ( Virat Kohli) नाव घेऊन मोठा दावा केला आहे. त्यांनी टीम इंडियाच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित केला. आयपीएल २०२१साठी टीम इंडियानं पाचवी कसोटी रद्द केली, असा दावाही त्यांनी केला.
Cricket.com शी बोलताना गोवर म्हणाले की, ''मी मँचेस्टर कसोटी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेलो होतो आणि अखेरच्या क्षणाला ती रद्द करण्यात आली. सामन्याच्या आधी विराट कोहलीनं बीसीसीआयला ई मेल पाठवला होता. यापूर्वी अनेक सामने रद्द झालेला आम्ही पाहिले आहेत. पण, हा सामना अखेरच्या क्षणाला रद्द केला गेला. एक दिवसाआधी विराटनं बीसीसीआयला ई मेल केला होता. याबाबत अधिक स्पष्टता होणे गरजेची आहे.''
IPL 2021साठी भारत-इंग्लंड पाचवी कसोटी गुंडाळली?; सौरव गांगुलीनं उलगडला पूर्ण एपिसोड!
''आयपीएलच्या तारखा एवढ्या जवळ आल्या होत्या की कसोटी सामना रद्द करावा लागला. मला विराट कोहलीचे एक विधान आठवतं. तो म्हणाला होता की,' माझ्यासाठी कसोटी क्रिकेट अधिक महत्त्वाचे आहे.' मँचेस्टर कसोटी रद्द होणे दुर्दैवी आहे. येणाऱ्या काळात अनेक गोष्टींचा उलगडा होईल,''असेही ते म्हणाले.
कधी होऊ शकते रद्द झालेली मँचेस्टर कसोटी?
इंग्लंडनं नुकतंच त्यांचे २०२२च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार टीम इंडिया वन डे व ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी पुढील वर्षी लंडनमध्ये दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या या मालिकेत आता एका कसोटी सामन्याचा समावेश केला जाऊ शकतो. १ जुलै ते १४ जुलै या कालावधीत टीम इंडिया येथे तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर १९ जुलै ते १२ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे, तीन ट्वेंटी-२० व तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल. आता एका कसोटी सामन्याच्या समावेशानंतर दक्षिण आफ्रिका दोऱ्याच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.