Shoaib Bashir Ruled Out of IND vs ENG Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या रोमांचक कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने पूर्ण झाले आहेत. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला होता, जिथे टीम इंडियाचा २२ धावांनी पराभव झाला. यासह, इंग्लंड संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे . पण यादरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. लॉर्ड्स कसोटीत ज्याने इंग्लंडला सिराजची विजयी विकेट मिळवून दिली, तोच खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मालिकेतून बाहेर पडला आहे.
बोटाला दुखापत, उर्वरित मालिकेतून माघार
इंग्लंड क्रिकेट संघाचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीर दुखापतीमुळे उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे . बशीरच्या डाव्या बोटात गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान रवींद्र जाडेजाचा वेगवान फटका अडवताना त्याच्या हाताला लागल्याने ही दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. सुरुवातीला त्याच्या तंदुरुस्तीबद्दल अनिश्चितता होती, परंतु आता वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या बोटातील हाड तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड लवकरच त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करेल.
लॉर्ड्स कसोटीत संघाला मिळवून दिला विजय
या सामन्याच्या पहिल्या डावात शोएब बशीरला दुखापत झाली. तरीही, त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुखापत असूनही तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला आणि ९ चेंडूत २ धावा काढल्या. त्यानंतर, त्याने मोहम्मद सिराजची महत्त्वाची विकेट घेतली आणि संघाला विजयी केले. भारताला विजयासाठी फक्त २२ धावांची आवश्यकता असताना त्याने ही विकेट घेतली. बशीरने ती विकेट घेत टीम इंडियाचा डाव संपवला.
बशीरच्या अनुभवाची उणीव भासणार
या मालिकेत बशीर इंग्लंडच्या महत्त्वाच्या फिरकी गोलंदाजांपैकी एक होता आणि त्याच्या अनुपस्थितीचा संघाच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. आता संघ व्यवस्थापनाला त्याच्या जागी नवीन पर्याय शोधावा लागेल. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये शोएब बशीरला खेळण्याची संधी मिळाली . या दरम्यान त्याने एकूण १० विकेट घेतल्या. या मालिकेत तो इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच, भारताची शेवटची विकेटही त्यानेच घेतली.