Join us

India VS England: मोटेरा स्टेडियम पाहून खेळाडू झाले चकित; प्रेक्षकांसमोर खेळण्यास उत्सुक

भारत आणि इंग्लंड यांच्यात २४ फेब्रुवारीपासून दिवस -रात्रीचा सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 06:55 IST

Open in App

अहमदाबाद : जगातील अनेक स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव असलेल्या भारतीय खेळाडूंनी शनिवारी नवनिर्मित मोटेरा स्टेडियम पाहताच त्यांच्या तोंडून ‘वॉव’ हे शब्द बाहेर पडले. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा समजून घेताना त्यांना जवळपास एक तास लागला. एक लाख दहा हजार इतकी विशाल प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममधील तब्बल चार ड्रेसिंग रूम असून तेदेखील जिमशी जोडले गेले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २४ फेब्रुवारीपासून दिवस -रात्रीचा सामना रंगणार आहे. येथे विद्युत टॉवर नाहीत. स्टेडियमच्या छतावर एलईडी लाईट्‌स लावण्यात आले आहेत. त्यामुळे हवेत चेंडू स्पष्टपणे दृष्टीस पडतो. अष्टपैलू हार्दिक पांड्या याने बीसीसीआयकडून टाकण्यात आलेल्या व्हिडिओत स्वत:ची प्रतिक्रिया दिली. हार्दिक म्हणाला,‘ जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांपुढे खेळण्यास मी उत्सुक आहे. तो क्षण शानदार असेल. सर्वच सहकाऱ्यांना स्टेडियम पसंत आले.

आम्हा सर्वांना सुविधांची माहिती घेण्यास एक तास लागला. भारतात हे स्टेडियम आहे, याचा मला गर्व वाटतो. येथे रोमांचक सामने होतील. ज्या ड्रेसिंग रूमला जिमशी जोडण्यात आले आहे असे स्टेडियम मी तरी पाहिलेले नाही. ज्या लोकांनी हे स्टेडियम उभारले त्यांचे तसेच जीसीएचे आभार मानतो.’

चेतेश्वर पुजारा म्हणाला, ‘फारच सुंदर स्टेडियम आहे. येथे फार छान वाटते. मी येथे पहिला सामना खेळण्याच्या प्रतीक्षेत आहे.’  सलामीवीर मयांक अग्रवाल म्हणाला, ‘मोटेराच्या आत जाताच प्रेक्षक स्टॅन्ड पाहून चकाकलो. मी कधी इतक्या मोठ्या स्टेडियममध्ये खेळलो नाही. अशाप्रकराचे भव्य जिमदेखील कधी पाहिले नव्हते.’

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडगुजरातभारत