ट्रेंटब्रिज : भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज मयंक अग्रवाल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. मयंक नेटमध्ये सराव करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर नसली तर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मयंक नेटमध्ये सराव करताना मोहम्मद सिराजच्या आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर फटका चुकला आणि चेंडू हेल्मेटवर आदळला. मागच्या बाजूला चेंडू लागल्याने दुखापत झाली. हेल्मेट काढल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर फिजिओ नितीन पटेल यांनी त्याची तपासणी केली. याच्यावर उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने याबाबत सोमवारी माहिती दिली. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर मयंकला पहिल्या कसोटीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या जागी लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभमन गिल, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे यापूर्वीच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला मुकले आहेत. या तीन खेळाडूंच्या जागी बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना पाठवले आहे. हे दोन्ही खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात होते. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला बुधवार ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाईल.
भारत- इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी ट्रेंटब्रिज येथे सुरुवात होणार आहे.त्याआधी सोमवारी मालिकेतील चषकाचे अनावरण उभय संघांचे कर्णधार ज्यो रुट आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आले.