लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाची विजयी मालिका यजमान इंग्लंड संघाने रविवारी संपुष्टात आणली. करो वा मरो अशा कात्रित सापडलेल्या इंग्लंड संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना 337 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. इंग्लंडने 31 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं बाऊंड्री लाइन जवळ असल्यानेच इंग्लंड जिंकला, असे कारण सांगितले आहे.
जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 160 धावांची विक्रमी भागीदारी करून इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यांना जो रूट ( 44) आणि बेन स्टोक्स (79) यांनी धावांचा पाऊस पाडताना इंग्लंडला 337 धावांपर्यंत मजल मारून दिली. रोहित शर्मा ( 102), विराट कोहली ( 66) , हार्दिक पांड्या ( 45), महेंद्रसिंग धोनी ( 42) आणि रिषभ पंत ( 32) यांची खेळी व्यर्थ ठरली. या सामन्यात विजय शंकरला दुखापतीमुळे खेळवण्यात आले नव्हते. त्याच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली होती. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने एकूण 13 षटकार लगावले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी रिव्हर्स स्वीप मारून भारतीय गोलंदाजांना हैराण केले.