पुणे : सलामीवीर शिखर धवन, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीनंतर भुवनेश्वर कुमार (३-४२) व शार्दूल ठाकूरच्या (४-६७) यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी येथील गहुंजे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व निर्णायक लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ अशी सरशी साधली. यापूर्वी कसोटी व टी-२० मालिका जिंकणाऱ्या यजमान भारतीय संघाने वन-डे मालिकेतही विश्वविजेत्या संघाचा पराभव करीत वर्चस्व गाजवले. सामन्यातील अखेरचे निर्णायक षटक टाकणाऱ्या नटराजनने १० षटकांत ७३ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. (India VS England: India beat England & win the ODI series)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव ४८.२ षटकांत ३२९ धावांत संपुष्टात आला, पण गोलंदाजांनी अचूक मारा करीत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा डाव ५० षटकांत ९ बाद ३२२ धावांत रोखला. इंग्लंडतर्फे सॅम कुरेन (नाबाद ९५, ८३ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार) व डेव्हिड मलान (५०) यांनी झळकावलेली अर्धशतके अखेर व्यर्थच ठरली. सॅम कुरेन आठव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
त्याआधी, धवन (५६ चेंडू, ६७ धावा, १० चौकार) आणि रोहित शर्मा (३७ चेंडू, ३७ धावा, ६ चौकार) यांनी सलामीला १०३ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली; पण मधल्या षटकांमध्ये चार विकेट एकापाठोपाठ एक गेल्यामुळे भारताची ४ बाद १५७ अशी स्थिती झाली. त्यानंतर ऋषभ पंत (६२ चेंडू, ७८ धावा) आणि हार्दिक पांड्या (४४ चेंडू, ६४ धावा) यांनी ९९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. या दोघांनी प्रत्येकी पाच चौकार व ४ षटकार लगावले.
भारताने अखेरच्या चार विकेट केवळ ८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. इंग्लंडतर्फे मार्क वूडने ३४ धावांच्या मोबदल्यात ३ आणि आदिल राशिदने ८१ धावांत २ बळी घेतले.
आठव्या क्रमांकावर वैयक्तिक सर्वोच्च खेळी करणारे फलंदाज
नाबाद ९५ सॅम कुरेन विरुद्ध भारत (पुणे) २०२१
नाबाद ९५ ख्रिस व्होक्स विरुद्ध श्रीलंका नॉटिंघम २०१६
नाबाद ९२ आंद्रे रसेल विरुद्ध भारत नॉर्थ साऊंड २०११
९२ नॅथन कुल्टर नाईल विरुद्ध वेस्ट इंडिज नॉटिंघम २०१९
नाबाद ८६ रवी रामपाल विरुद्ध भारत विशाखापट्टणम २०११
नाणेफेकीत कोहली अपयशी
इंग्लंडविरुद्ध रविवारी संपलेल्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली नाणेफेकीत अपयशी ठरला. मालिकेतील एकूण १२ सामन्यांपैकी (चार कसोटी, पाच टी-२०, तीन वन डे) दहा सामन्यांत त्याने नाणेफेक गमावली. इंग्लंडविरुद्ध भारताने त्याच्या नेतृत्वात एकूण ३५ सामने खेळले असून यापैकी आठ वेळा तो नाणेफेक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. त्यात १४ कसोटींत दोनदा, दहा वन डेत तीन वेळा आणि ११ टी-२० त तीन वेळा नाणेफेकीत कोहलीने बाजी मारली होती.
मोईनने विराटला केले दुसऱ्यांदा क्लीन बोल्ड
n कोहलीला बाद करणे कुठल्याही गोलंदाजासाठी सुखावणारे असते. तिसऱ्या वन-डेमध्ये विराटला संघासाठी विशेष कामगिरी करता आली नाही. तो केवळ ७ धावा काढून बाद झाला. n मोईन अलीने त्याला क्लीन बोल्ड करीत विशेष पराक्रम केला. विराट कोहली वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकीपटूविरुद्ध दोनदा क्लीन बोल्ड झाला आहे आणि हा गोलंदाज मोईन अली. n या व्यतिरिक्त त्याला आतापर्यंत केवळ दोन वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोनवेळा क्लीनबोल्ड केले आहे. त्यात नॅथन कुल्टर नाईल व शेल्डन कॉर्टरेल यांचा समावेश आहे. मोईनने विराटला नवव्यांदा बाद केले आहे.
रोहित-धवन जोडीचा विक्रम
धावफलक
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. राशीद ३७, शिखर धवन झे. आणि गो. राशीद ६७, विराट कोहली त्रि. गो. मोईनअली ७, ऋषभ पंत झे. बटलर गो. कुरेन ७८, लोकेश राहुल झे. मोईन गो. लिव्हिंगस्टोन ७, हार्दिक पांड्या त्रि. गो. स्टोक्स ६४, कृणाल पांड्या झे. रॉय गो. वुड २५, शार्दुल ठाकूर झे. बटलर गो. वुड ३०, भुवनेश्वर कुमार झे. सॅम कुरेन गो. टॉपले ००, प्रसिद्ध कृष्णा त्रि. गो. वुड ००, टी नटराजन नाबाद ०० अवांतर: ११, एकूण : ४८.२ षटकांत सर्वबाद ३२९ धावा. गडी बाद क्रम: १/१०३, २/११७,३/१२१, ४/१५७, ५/२५६,६/ २७६,७/३२१,८/ ३२८,९/३२९,१०/३२९. गोलंदाजी : सॅम कुरेन ५-०-४३-१, टॉपले ९.२-०-६६-१, वुड ७-१-३४-३, स्टोक्स ७-०-४५-१, राशिद १०-०-८१-२, मोईन ७-०-३९-१, लिव्हिंगस्टोन ३-०-२०-१.
इंग्लंड : जेसन रॉय त्रि. गो. भुवनेश्वर १४, जॉनी बेयरस्टो पायचित गो.भुवनेश्वर ०१, बेन स्टोक्स झे. धवन गो. नटराजन ३५, डेव्हिड मलान झे. रोहित गो. ठाकूर ५०, जोस बटलर पायचित गो. ठाकूर १५, लियम लिविंगस्टोन झे. व गो. ठाकूर ३६, मोईन अली झे. हार्दिग गो. भुवनेश्वर २९, सॅम कुरेन, आदिल राशिद झे. कोहली गो. ठाकूर १९, मार्क वूड धावबाद १४, रिसी टॉप्ले नाबाद ०१. अवांतर (१३). एकूण ५० षटकांत ९ बाद ३२२ . बाद क्रम : १-१४, २-२८, ३-६८, ४-९५, ५-१५५, ६-१६८, ७-२००, ८-२५७, ९-३१७. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-०-४२-३, नटराजन १०-०-७३-१, कृष्णा ७-०-६२-०, ठाकूर १०-०-६७-४, हार्दिक ९-०-४८-०, कृणाल ४-०-२९-०.