लंडन - भारताचा कर्णधार विराट कोहली याला रोखण्यासाठी इंग्लंडचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच तिस-या वन डे सामन्यात विराटला अप्रतिम चेंडूवर बाद करणा-या आदिल रशिदला निवृत्तीचा विचार मागे घेण्याची गळ इंग्लंडने घातली आहे. रशिदही इंग्लंड क्रिकेट संघाच्या विनंतीवर विचार करत आहे आणि त्याने कसोटी मालिकेत खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
30 वर्षीय रशिदने फेब्रुवारी महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्याने यॉर्कशर क्लबसोबत करार करताना पाच दिवसांच्या सामन्याचा निर्णय बदलणार नसल्याचे संकेत दिले होते. रशिदने दहा कसोटी सामने खेळले आहेत. तो म्हणाला, सध्याच्या घडीला यॉर्कशर क्लबकडून खेळण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहे. पण, भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत संघाला माझी गरज असेल तर त्याचा नक्की विचार करेन. या वर्षाच्या सुरूवातीला मी वन डे क्रिकेटवरच फोकस करणार असल्याचे ठरवले होते, परंतु आतल्याआत कसोटी क्रिकेटची उणीव जाणवत होती.
इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलीस यांनी रशिदच्या पुनरागमनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, हा निर्णय अदिलने घ्यायला हवा. निवड समिती प्रमुख एड स्मिथ यांनी त्याच्याशी चर्चा केली आहे की नाही, याची मला कल्पना नाही. पण तो कसोटी संघात नक्की परतेल.