India vs England Both Teams Scored Same Total In Their First Innings See Record : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. लॉर्ड्सच्या मैदानातील कसोटीत पहिल्यांदाच दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारली आहे. पण क्रिकेटच्या इतिहासातील ही काही पहिली वेळ नाही. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा नववा कसोटी सामना आहे ज्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या केल्याचे पाहायला मिळाले. इथं एक नजर टाकुयात आतापर्यंत कोणत्या टेस्टमध्ये हे ट्विस्ट पाहायला मिळालं अन् त्या सामन्याचा निकाल काय लागला? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!दक्षिण आफ्रिका विरुद्ध इग्लंड, १९९ धावा (१९१०), पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ ठरला विजेता
१९१० मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील डरबनच्या मैदानातील कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या केली होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १९९ धावांवर आटोपल्यावर इंग्लंच्या संघाने त्यांची बरोबरी केली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३४७ धावा करत इंग्लंडसमोर ३४८ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २५२ धावांवर आटोपला अन् यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९५ धावांनी हा सामना खिशात घातला होता.
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज २२२ धावा (१९५८) धावांचा पाठलाग करण्यात टीम इंडियाच्या पदरी निराशा
भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाने कानपूरच्या मैदानातील कसोटी सामन्यात पहिल्या डावात २२२ धावा केल्यावर टीम इंडियानेही तेवढ्याच धावा करून पहिल्या डावात कॅरेबियन संघाची बरोबरी साधली होती. वेस्ट इंडिजच्या संघानं दुसऱ्या डावात ७ बाद ४४३ धावा करत टीम इंडियासमोर ४४४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २४० धावांवर आटोपला अन् पाहुण्या वेस्ट इंडिज संघाने हा सामना २०३ धावांनी जिंकलेला.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, ४०२ धावा (१९७३)
१९७३ मध्ये पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील ऑकलंडच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४०२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडनंही या सामन्यात पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या संघाने २७१ धावा केल्यावर २७३ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात ९२ धावा केल्या अन् हा सामना अनिर्णित राहिला.
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ४२८ धावा (१९७३)
१९७३ मध्ये जमेकाच्या सबिना पार्कच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यातही दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद ४२८ धावांवर डाव घोषित केल्यावर वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात ४२८ धावांवर ऑल आउट झाला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकण्याच्या इराद्याने दुसऱ्या डावात २ बाद २६० धावांवर डाव घोषित केला. पण सरशेवटी वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३ बाद ६७ धावा करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
इंग्लंड विरुद्ध भारत ३९० धावा (१९८६)
१९८६ मध्ये इंग्लंड भारत यांच्यात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात ३९० धावा केल्या होत्या. यावेळीही इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी केली होती. दुसऱ्या डाावात इंग्लंडचा संघ २३५ धावांवर ऑल आउट झाल्यावर भारतीय संघाला २३६ धावांचे टार्गेट मिळाले होते. ५ बाद १७४ धावा करत भारतीय संघाने हा सामना अनिर्णित राखला होता. पहिल्या दोन सामन्यातील विजयासह टीम इंडियाने ही मालिका २-० अशी जिंकली होती.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ५९३ धावा (१९९४)
१९९४ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने ॲंटिगाच्या घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रायन लारानं केलेल्या ३७५ धावांच्या खेळीच्या जोरावर ५ बाद ५९३ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. इंग्लंडचा संघ या सामन्यात पहिल्या डावात ५९३ धावांवर ऑल आउट झाला होता. हा सामनाही अनिर्णित राहिला होता.
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २४० धावा (२००३), मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग
२००३ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने ॲंटिगाच्या घरच्या मैदानातील सामन्यात ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४० धावा केल्यावर वेस्ट इंडिजनेही पहिल्या डावात तेवढ्याच धावा काढल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ४१७ धावा करत वेस्ट इंडिजच्या संघासमोर ४१८ धावांचे टार्गेट सेट केले होते.
इंग्लंड-न्यूझीलंड, ३५० धावा (२०१५), पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने मारली बाजी
२०१५ मध्ये इंग्लंड- न्यूझीलंड यांच्यातील लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात या दोन्ही संघांनी पहिल्या डावात ३५० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या संघाने ८ बाद ४५४ धावांवर डाव घोषित करत इंग्लंडसमोर ४५५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २५५ धावांवर आटोपला होता. हा सामना न्यूझीलंडच्या संघाने १९९ धावांनी जिंकला होता.
फिफ्टी फिफ्टी
आतापर्यंत पहिल्या डावात समान धावसंख्या पाहायला मिळालेल्या ८ कसोटीत ४ सामन्याचे निकाल लागले असून सर्वोच्च धावसंख्येनंतर ४ सामने अनिर्णित राहिले आहे. ज्या सामन्याचा निकाल लागला त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला असून फक्त एकदाच धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. लॉर्ड्सच्या मैदानातील भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात ३८७ धावा केल्या आहेत. ही पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या असून हा सामना निकाली लागणार की, अनिर्णत राहणार ते पाहण्याजोगे असेल.