ओव्हल, भारत वि. इंग्लंड : भारताच्या इग्लंड दौऱ्यावर कर्णधार विराट कोहलीने एकट्याने फलंदाजांची सर्व जबाबदारी स्वीकारत अनेक विक्रम मोडले. मात्र, पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत शुन्यावर बाद झाल्याने त्याला महान फलंदाज राहुल द्रविड याचा विक्रम मोडता आला नाही. या दौऱ्यात ६०० धावा पूर्ण करण्यासाठी विराटला अवघ्या काही धावा हव्या होत्या. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने त्याला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. या 'गोल्डन डक' मुळे इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम त्याला नावावर करता आला नाही.
(आजी-माजी कर्णधारांचे शतक; भारताला ४६४ धावांचे आव्हान)
सामन्यात काय घडले?
ॲलिस्टर कुक आणि जो रूट यांच्या २५९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने आपला दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. पण जेम्स अँडरसनने एकाच षटकात शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांना बाद करून भारताची अवस्था २ बाद १ धाव अशी केली. त्यानंतर भारतीय संघाच्या मदतीला विराट मैदानावर आला,परंतु ब्रॉडच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हातात झेल देऊन शुन्यावर माघारी फिरला.
विराटला ९ धावांनी विक्रमाची हुलकावणी इंग्लंड दौऱ्यावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट आघाडीवर आहे. त्याने या मालिकेत २ शतक आणि ३ अर्धशतकांसह ५९३ धावा केल्या आहेत. मात्र त्याला इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूच्या विक्रमाने अवघ्या ९ धावांनी हुलकावणी दिली. हा विक्रम द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने २००२ च्या इंग्लंड दौऱ्यावर ४ कसोटी सामन्यांत ३ शतक व १ अर्धशतक करताना ६०२ धावा चोपल्या होत्या. हा इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावांचा भारतीय फलंदाजाचा विक्रम आहे.
चार वर्षानंतर पहिल्या चेंडूवर बाद झाला कोहली २०१४ च्या लॉर्ड्स कसोटीत विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता आणि त्यानंतर चार वर्षानंतर तो पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. शुन्यावर बाद होण्याची विराटची ही इंग्लंडविरुद्धची तिसरी, तर एकूण सातवी वेळ आहे.