Join us

IND vs ENG: भारताचा दबदबा! सचिनकडून अभिनंदन; 'वीरू'नं सांगितला इंग्लंडचा अभाव

India vs England 5th Test: पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:42 IST

Open in App

India vs England 5th Test updates: भारताने पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघाचा दारूण पराभव करून मालिका ४-१ ने जिंकली. इंग्लंडने हैदराबाद येथील पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर इंग्लिश संघाची गाडी रूळावरून खाली घसरली अन् सलग चार सामने गमवावे लागले. शनिवारी अखेरचा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मालिका ४-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारताने मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा कसोटी सामना एक डाव ६४ धावांनी जिंकला. भारताने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडकडून जो रूटने एकट्याने खिंड लढवली. पण त्याला कुलदीप यादवने बाद करून इंग्लिश संघाला १९५ धावांत गुंडाळले. भारताच्या विजयानंतर माजी खेळाडूंनी टीम इंडियाचे तोंडभरून कौतुक केले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितसेनेचे कौतुक केले. तर वीरेंद्र सेहवागने इंग्लिश संघाला लक्ष्य केले. सचिन म्हणाला की, पहिला कसोटी सामना गमावून देखील टीम इंडियाने ४-१ ने मालिका जिंकली. मालिका जिंकण्यासाठी त्यांनी केलेले पुनरागमन कौतुकास्पद आहे. संपूर्ण मालिकेत कुलदीप यादवने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेतला. धर्मशाला कसोटीत आर अश्विनची कामगिरी उल्लेखनीय राहिली. 

"बॅझबॉल कसोटीत बत्ती गुल, जिंकण्यासाठी जिद्द असावी लागते. इंग्लंडकडे स्पर्धा करण्यासाठी खेळ नव्हता आणि दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ते स्पष्ट दिसत होते. इंग्लिश कर्णधार अपयशी ठरल्याने त्यांच्या संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली. ते फक्त एका भ्रमात राहिल्यासारखे दिसत होते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी वेडेपणा, जिद्द असणे आवश्यक असते, ज्याचा इंग्लंडकडे तीव्र अभाव आहे", असे सेहवागने म्हटले. 

भारताचा मोठा विजय दरम्यान, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या होत्या. इंग्लंडने २१८ धावा केल्यानंतर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात ४७७ धावा करून २५९ धावांची चांगली आघाडी घेतली. रोहित शर्मा (१०३), शुबमन गिल (११०), यशस्वी जैस्वाल (५७), देवदत्त पडिक्कल (६५) आणि सर्फराज खान (५६) यांनी अप्रतिम खेळी करून इंग्लिश संघासमोर धावांचा डोंगर उभारला. यजमान संघाने २५९ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाकडून जो रूटने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली आणि जॉनी बेअरस्टोने (३९) धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही शिलेदाराला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात ४८.१ षटकांत सर्वबाद १९५ धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागभारतीय क्रिकेट संघ