Join us  

IND vs ENG Test: इंग्लंडचा शेवटही कडू! भारताचे एकतर्फी वर्चस्व; अखेरचा सामना तिसऱ्याच दिवशी संपला

India vs England 5th Test Live updates: भारताने पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघाचा दारूण पराभव केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 2:04 PM

Open in App

India vs England 5th Test Live updates In Marathi | धर्मशाला: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मागील दोन महिन्यांपासून भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या पदरी निराशा पडली. पाच सामन्यांमधील केवळ एक सामना जिंकण्यात पाहुण्या संघाला यश आले. हैदराबाद येथे झालेला पहिला सामना जिंकून इंग्लंडने विजयी सलामी दिली होती. पण, त्यानंतर यजमान भारताने सलग चार सामने जिंकून विजयाचा चौकार लगावला. शनिवारी अखेरचा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मालिका ४-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारताने मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा कसोटी सामना एक डाव ६४ धावांनी जिंकला. भारताने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडकडून जो रूटने एकट्याने खिंड लढवली. पण त्याला कुलदीप यादवने बाद करून इंग्लिश संघाला १९५ धावांत गुंडाळले. पाहुण्यांनी आपल्या दुसऱ्या डावात ४८.१ षटकांत सर्वबाद १९५ धावा केल्या.

इंग्लंडचा पहिला डावइंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या होत्या. झॅक क्रॉली (१०८ चेंडू ७९ धावा) वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. पाहुण्या संघाकडून बेन डकेट (२७), ओली पोप (११), जो रूट (२६), जॉनी बेअरस्टो (२९), बेन स्टोक्स (०), बेन फोक्स (२४), टॉम हर्टली (६), मार्क वुड (०) आणि शोएब बशीरने नाबाद ११ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर आर अश्विन (४) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले. 

भारताचा पहिला डावइंग्लंडने २१८ धावा केल्यानंतर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात ४७७ धावा करून २५९ धावांची चांगली आघाडी घेतली. रोहित शर्मा (१०३), शुबमन गिल (११०), यशस्वी जैस्वाल (५७), देवदत्त पडिक्कल (६५) आणि सर्फराज खान (५६) यांनी अप्रतिम खेळी करून इंग्लिश संघासमोर धावांचा डोंगर उभारला. याशिवाय रवींद्र जडेजा (१५), आर अश्विन (०), कुलदीप यादव (३०), जसप्रीत बुमराहने (२०) धावा केल्या. पाहुण्या संघाकडून शोएब बशीरने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर बेन स्टोक्स (१) आणि जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. 

इंग्लंडचा दुसरा डावयजमान संघाने २५९ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले. या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचून सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची मोठी जबाबदारी बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील संघावर होती. पण, इंग्लिश संघ पूर्णपणे अपयशी ठरला अन् सामना एक डाव आणि ६४ धावांनी गमवावा लागला. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाकडून जो रूटने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली आणि जॉनी बेअरस्टोने (३९) धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही शिलेदाराला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियाकडून आर अश्विनने सर्वाधिक (५) बळी घेऊन इंग्लिश संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर जसप्रीत बुमराह (२) आणि कुलदीप यादव (२) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले.  

पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव. 

इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटआर अश्विनरोहित शर्माशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ