मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन याने कडक सिक्सरसह डावाची सुरुवात केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत संजूनं खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा भारताचा तो तिसरा बॅटर ठरला. याआधी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी अशी कामगिरी केली होती. वानखेडेवरील भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुपरस्टार आमिर खानही स्टेडियमवर उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर सिक्सर मारणाऱ्या संजूला त्याने टाळ्या वाजवून दाद दिली. पण संजूचा हा तोरा फार काळ टिकला नाही.
..अन् संजू आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुन्हा फसला
संजू सॅमसन इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या सामन्यातही आखूड टप्प्याच्या चेंडूवर झेलबाद झाल्याचे पाहायला मिळाले. याआधीच्या चारही मॅचमध्ये तो याच प्रकारे आउट झाला होता. वानखेडे स्टेडियमवर पहिल्या षटकात आक्रमक फलंदाजी करत मागील उणीव भरून काढण्याचे संकेत त्याने दिले. पण मार्क वूडच्या गोलंदाजीवर तो फसला. ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारासह त्याच्या खेळीला अवघ्या १६ धावांवर ब्रेक लागला. गोलंदाज बदलला मैदान बदलले पण आउट होण्याचा संजूचा पॅटर्न अगदी तोच राहिल्याचा सीन पाहायला मिळाला.
पाच सामन्यातील ३ सामन्यात दुहेरी आकडाही नाही गाठला
संजू सॅमसन याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात २० चेंडूत २६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. प्रत्येक सामन्यात त्याने अनुक्रमे ५, ३ आणि १ धावांवर बाद झाला. यावेळी पहिल्या सामन्याप्रमाणे त्याने दुहेरी आकडा गाठला. पण ही खेळी मोठी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. संजूनं पाच सामन्यांच्या मालिकेतील ५ डावात १०.२० च्या सरासरीसह ११८.६० च्या सरासरीनं फक्त ५१ धावा केल्या आहेत.