Join us

IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...

अंशुल कंबोजसह जडेजाला मिळाली विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 23:40 IST

Open in App

IND vs ENG 4th Test Day 2 Stumps : भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्यासह यजमान संघाच्या सलामीवीरांनी गाजवला. बेन स्टोक्सनं पंजा मारत भारतीय संघाचा डाव ३५८ धावांत आटोपला. त्यानंतर झॅक क्रॉउली आणि बेन डकेट या जोडीनं इंग्लंडच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांना शतकी खेळी पासून रोखल्याची गोष्ट सोडली तर भारतीय गोलंदाजांना खास छाप सोडण्यात अपयश आले. परिणामी इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ४६ षटकांच्या खेळात २ विकेट्सच्या मोबदल्यात २२५ धावा केल्या आहेत. जो रुट ११ (२७) आणि ओली पोप २० (४२) ही जोडी मैदानात खेळत होती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिल आणि इंग्लंडच्या सलामीवीरांच्या मोठा राडा पाहायला मिळाला होता. चौथ्या कसोटी सामन्याआधी  झॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांच्यासोबतच्या वादावर बोलताना शुबमन गिलनं दोघांची अब्रू काढली होती. ९० सेकंदाचा खेळात त्यांनी अखिलाडूवृत्तीचं कृत्य केल्याचे गिल म्हणाला होता. त्याच सलामी जोडीनं चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी रचली.

शार्दुल ठाकूरच्या उपयुक्त खेळीनंतर पिक्चरमध्ये आला पंत

भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर जोडीनं दुसऱ्या दिवशी ४ बाद २६४ धावांवरुन खेळाला सुरुवात केली.  जोफ्रा आर्चरनं रवींद्र जडेजाच्या रुपात टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. जड्डूनं ४० चेंडूत २० धावांची खेळी केली. शार्दुल ठाकूर ८८ चेंडूत ४१ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर पंत पिक्चरमध्ये आला. पायाला फॅक्चर असूनही तो बॅटिंगसाठी मैदानात उतरला. एवढेच नाही तर त्याने अर्धशतकी खेळीसह अनेक विक्रमही रचले. पण आर्चरच्या चेंडूवर तो आउट झाला अन् टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. वॉशिंग्टन सुंदरनं ९० चेंडूत २७ धावांची खेळी केली. पहिल्या डावात पंतशिवाय ५४ (७५) यशस्वी जैस्वाल ५८ (१०१) आणि साई सुदर्शनच्या ६१ (१५१) अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३५८ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक ५  विकेट्स घेतल्या. जोफ्रानं ३ तर ब्रायनड कार्स आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलबेन स्टोक्सरवींद्र जडेजारिषभ पंत